अहमदनगर जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक झाला आहे. यात राहुरी तालुका मागे राहिला नाही. राहुरी तालुक्यासह शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील बहुतेक वॉर्डांत कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने राहुरी नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात हायपोक्लोराईड औषधाची फवारणी करण्यास सुरुवात गुरुवारी संध्याकाळी शहरात करण्यात आली.
यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुऱ्हे, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, नगरसेवक दिलीप चौधरी, नंदू तनपुरे, सोन्याबापू जगधने, संजय साळवे, आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत औषधी फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली. संपूर्ण राहुरी शहरात हायपोक्लोराईड औषधाची फवारणी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुऱ्हे यांनी सांगितले.