खिलाडूवृत्तीमुळे जीवनात सहजता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:16+5:302021-02-14T04:19:16+5:30
संगमनेर : निरोगी शरीर व चांगले आरोग्य ही माणसाची मोठी संपत्ती आहे. यासाठी व्यायाम व चांगला आहार अत्यावश्यक आहे. ...
संगमनेर : निरोगी शरीर व चांगले आरोग्य ही माणसाची मोठी संपत्ती आहे. यासाठी व्यायाम व चांगला आहार अत्यावश्यक आहे. याचबरोबर मन प्रसन्न राहणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे. कारण त्यामधूनच हार - जीत पचविण्याची शक्ती निर्माण होते. खिलाडूवृत्तीमुळे जीवनात सहजता येते, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत ‘अमृतवाहिनी प्रीमियर लीग’च्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी (दि. १२) थोरात बोलत होते. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्रा. अशोक मिश्रा, प्रा. बाळासाहेब शिंदे, प्रा. सुनील सांगळे, नामदेव गायकवाड, प्राध्यापक जी. बी. काळे आदी उपस्थित होते.
कोरोनाने मानवाला पुन्हा एकदा स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले. जीवनामध्ये प्रत्येकजण स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि तीच मोठी चूक होऊन जाते. प्रत्येकाने ताण-तणावातून मुक्त राहण्यासाठी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे. छंद हे माणसाला नेहमी ऊर्जा देतात, असेही थोरात म्हणाले.