राहुरी : शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेस जिल्ह्यात चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (५जुलै) पत्रकार परिषदेत दिली.
दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा व्हावा या बाबीशी आपण सहमत आहोत. ते लगेच शक्य नाही. मात्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी मार्फ त हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या उपकेंद्राच्या पाच किलोमीटरच्या परिसरातील शासकीय जमिनींवर सौर ऊर्जा प्रकल्प २ ते १० अश्वशक्तीपर्यंत उभारण्यास प्राधान्य दिले जाईल.
या माध्यमातून पाचशे ते सहाशे मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे शासनाचे धोरण आहे. ही योजना जुनी असली तरी तिला गती मिळालेली नव्हती. नगरला रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रलंबित प्रस्तावांवर विस्तृत विचारविनिमय झाला, असेही तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी लघु औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्यासाठी तज्ज्ञ अधिकाºयांची समिती १० जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. त्यांच्या व्यवहार्यतेच्या अहवालावर तातडीने कार्यवाही केली जाईल. शिर्डीसारखे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग, मुळा धरण दहा किलोमीटर अंतरावर अशा अनुकूल बाबी असल्यामुळे हा अहवालही सकारात्मक येईल. यामुळे विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
४लॉकडाऊनच्या काळात सरासरी वीज बिल वितरणाबाबतच्या तक्रारीत फारसे तथ्य नाही. याबाबतचे महावितरणचे धोरण लक्षात घेतल्यानंतर वीज ग्राहकांवर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्या काळात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी वितरण अधिकारी, कर्मचाºयांनी मेहनत घेतली. ते लक्षात घेता या वीज बिल वसुली बाबतही सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री तनपुरे यांनी केले.