बॅँजो पार्टीत काम करणारा सुरज झाला इंजिनिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:41 PM2019-07-07T13:41:59+5:302019-07-07T13:42:08+5:30
घाणीचे साम्राज्य.. डुकरांचा वावर.. वीज नाही.. सुटीच्या काळात बॅँजो पार्टीत काम.. अशा प्रतिकूल परिस्थितीत श्रीगोंदा शहरातील कैकाडी गल्लीतील सुरज प्रकाश गायकवाड हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : घाणीचे साम्राज्य.. डुकरांचा वावर.. वीज नाही.. सुटीच्या काळात बॅँजो पार्टीत काम.. अशा प्रतिकूल परिस्थितीत श्रीगोंदा शहरातील कैकाडी गल्लीतील सुरज प्रकाश गायकवाड हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे.
वेतापासून झाप, कनिंग, टोपले विणण्याचे काम करणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न सुरजने पूर्ण केले आहे. शहरातील कैकाडी गल्ली येथे कष्टकरी कैकाडी समाजाची वस्ती आहे. शहरातील प्रमुख चौक असलेल्या शनी चौकाच्या बाजूलाच असलेल्या वस्तीत मुलभूत सुविधा नाहीत.
अनेक वडिलधारी मंडळी व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. घरातील महिलांवरच कुटुंब चालविण्याची जबाबदारी आहे. तरुणही रोजगाराच्या शोधात असतात. येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. येथील मुले मुलींही आता शिक्षणाचा गजर करू लागली आहेत. त्यामुळे समाज परिवर्तन आणि प्रबोधनाचा प्रकाश या गल्लीत येऊ लागला आहे.
येथील प्रकाश गायकवाड यांची दहा-बाय दहाची पत्र्याची एक खोली आहे. त्या खोलीत संगीता व प्रकाशने संसार थाटला आहे. त्यांना सुरज व धीरज ही दोन मुले आहेत. प्रकाश झाप, कनिंग विणण्याचे काम करायचे. नंतर त्या व्यवसायात काम शिल्लक न राहिल्याने ते मजुरी करू लागले. पत्नी संगीता यांनीही मुलांच्या शिक्षणासाठी भांडीकुंडी घासायचे काम स्वीकारले.
सुरजने श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये मेकॅ निकल इंजिनिअर होण्यासाठी प्रवेश घेतला.
त्यावेळी मित्रांनी त्याची इंजिनिअर होणार म्हणून टिंगल केली. ते आव्हान सुरजने स्वीकारले. शैक्षणिक फी भरण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी सुटीच्या दिवशी सुरज बॅँजो पार्टीत ढोलताशा वाजविण्याचे काम करायचा. रात्री कधी रॉकलेच्या दिव्याखाली तर कधी नगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करायचा.
सुरजने तिसºया वर्षाची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. त्याला तिसºया वर्षी ६८ टक्के गुण मिळाले आणि कैकाडी समाजातील सुरज इंजिनिअर झाला. त्याच्या निकालानंतर कैकाडी गल्लीतील तरुणांनी आनंदोत्सव साजरा केला.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पास झालो. त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ही मेहनत कामी आली. आता मला इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेऊन डिग्री मिळवायची आहे. -सुरज गायकवाड, श्रीगोंदा