सबका मालिक एक संदेश देणाऱ्या साईबाबांनी सर्वधर्मीय समवेत १९११ साली शिर्डीत श्रीराम नवमी उत्सवास सुरुवात केली. शिर्डीत दरवर्षी मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव साजरा केला जातो. मोठ्या संख्येने वाजतगाजत पालखी घेऊन पदयात्री शिर्डीत दाखल होत असतात. उत्सवाच्या प्रारंभदिनी साईनगरी भाविकांच्या गर्दीने फुलून जाते. गंगेच्या पाण्याची कावडीने वाद्यवृदांच्या निनादात भव्य मिरवणूक काढून साईबाबांना जलाभिषेक घालण्यात येतो. यंदा मात्र कोराना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील मंदिराप्रमाणे शिर्डीचे साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. उत्सवानिमित्त येणाऱ्या पदयात्रींना येऊ नये, असे कळविण्यात आले आहे.
गेल्यावर्षी सध्या पद्धतीने उत्सव साजरा केला. भाविकांनी आपल्या घरूनच बाबांचे दर्शन घेतले. श्रीरामनवमी उत्सवाच्या प्रथम दिवशी श्री साईबाबांच्या फोटोची आणि श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वीणा, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, दिलीप उगले, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी सहभाग घेतला. रमेश चौधरी, वैशाली ठाकरे व मंदिर पुजारी उपस्थित होते.
..........
श्रीरामवनमी उत्सवाच्या प्रथम दिवशी संस्थानचे उपमुख्यकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी सहपत्नीक समाधी मंदिरात पाद्यपूजा केली. श्रीरामवनमी उत्सवाच्या प्रथम दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यामध्ये वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी पहिला, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल पोरवाल यांनी दुसरा अध्याय, बांधकाम विभागाचे उपअभियंता दिनकर देसाई यांनी तृतीय, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम तांबे यांनी चौथा व वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका गाडेकर यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले.