कोपरगाव : खरीप हंगामात पीकविमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले असून, खरीप पीकविमा भरण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली आहे.
कोल्हे म्हणाल्या, प्रधानमंत्री खरीप पीकविम्याची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत होती. कोपरगावात सुरुवातीला मृग नक्षत्रात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले, त्यानंतर पावसाने ओढ दिली. परिणामी येथील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस झाला. त्यावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या; परंतु पीकविमा भरण्याची मुदत निघून गेल्याने शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले. त्याबाबत आपण केंद्र व राज्यस्तरावर पाठपुरावा करून खरीप पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, म्हणून कृषिमंत्री दादा भुसे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला होता. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा करून राज्य शासनाच्या प्रस्तावास खरीप पीकविमा भरण्यास मुदतवाढ दिली आहे.