पुणतांब्यातील दलित वस्तीत भीषण पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:59 PM2019-05-14T12:59:39+5:302019-05-14T13:00:11+5:30
येथील दलित वस्तीमध्ये सिध्दार्थनगर, अण्णा भाऊ साठे नगर, राजवाडा, आठरावाडी, एकोणवीस वाडी असे विभागलेल्या आहेत.
पुणतांबा : येथील दलित वस्तीमध्ये सिध्दार्थनगर, अण्णा भाऊ साठे नगर, राजवाडा, आठरावाडी, एकोणवीस वाडी असे विभागलेल्या आहेत. या सर्व वस्तीत सरकारी योजनेचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. पाणी टंचाई भीषण आहे. अनेक रोजगारांसाठी बाहेरगावी गेले आहे. पाण्यामुळे येथील नागरिक आमच्याकडे येऊ नका असे सांगत आहेत.
आठरावाडी, एकोणवीस वाडी येथील बहुतेक हे शेती महामंडळाचे कायम कामगार तर उर्वरित हे रोजंदारीचे कामगार होते. पण शेती महामंडळ बंद झाल्याने बहुतेक कामगारांचे मराठवाड्यात स्थलांतर झाले. जे कामगार आहेत, त्यांना पाण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवर अवलंबून रहावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. रोजंदारी सोडून पाणी आणावे लागत आहे. पाण्याच्या कारणाने घरातील लहान मोठ्या माणसांना परगावी पाठविले आहेत. येणाºया पाहुण्यांना आमच्याकडे पाणी नाही, येऊ नका.. असे सांगावे लागत आहे. आठरावाडी येथील रस्त्याचे मुरुमीकरण झाले आहे. तर काही रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.
जवळजवळ हीच परिस्थिती सिद्धार्थ नगर, अण्णा भाऊ साठे नगर, राजवाडा येथे आहे. इतर मूलभूत सुविधांपासून ह्या वस्त्या वंचित आहेत. सिध्दार्थ नगरमध्ये अर्धवट झालेला मुख्य रस्ता असला तरी त्याला जोडणारे उपरस्ते नाहीत. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पाणीच नाही. विहिरीत गाळ साचलेला आहे. कित्येक दिवसात पाण्याचा उपसा नाही. त्या योजनेचे पाईप गायब झालेले आहेत.
आजमितीला पाणी नाही. हायमॅक्सचे दिवे नाहीत. सिद्धार्थ नगरमध्ये दलित वस्ती सुधार योजनेची अंमलबजावणी होत आली तरी ती कामे पूर्ण नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सिद्धार्थ नगरची दलित वस्ती म्हणून नोंद नाही.
राजवाड्यामध्ये महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था दयनीय आहे. यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शौचालयाचे दरवाजे तुटलेली असून मैला साठवणाºया टाक्याच बांधल्या नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. महिलांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही. तर पाण्याच्या टाकीत पाणीच नाही. घरकूल योजनेतून बहुतेकांची घरे झालेली आहेत. घरात शौचालय बांधलेले आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे उघड्यावर शौचालयाला जाणे भाग पडू लागलेले आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव फक्त कागदपत्रात गुंडाळून राहिल्याचे दिसून येत आहे.
सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्ष लागवड झाली. झाडांना मनरेगा अंतर्गत पाणी दिले जाते. पण रोजंदारीसाठी ठराविक कुटुंबेच लाभ घेतात. अनेकांना मात्र रोजंदारीसाठी इतरत्र भटकावे लागत आहे.
सिद्धार्थ नगरातील अंतर्गत रस्तेच नसल्याने जाण्या येण्यासाठी नेहमीच अडचण होत आहे. रुग्णाला नेण्यासाठी दारापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नाही. - बाळासाहेब चिमाजी थोरात, पुणतांबा.
दुष्काळामुळे आज व्यापारावर परिणाम झाल्याने हमालीचे पण काम मिळेना. इतर कामासाठी पाणी नसल्याने गटारीला पाणी वाहत नाही. पाणी एकाच जागी गटारीत साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. -सुनील पगारे, पुणतांबा.