बनावट निघालेले एकूण किती ग्रॅम सोने आहे. तसेच त्यापोटी किती कर्ज दिले गेले. याची सविस्तर माहिती घेत असल्याचेही रेखी यांनी सांगितले. अर्बन बँकेच्या शेवगाव या तालुका पातळीवरील शाखेतून गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर सोनेतारण कर्ज वाटप झाले. तारण सोन्याचे बनावट व्हॅल्युएशन दाखवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटण्यात आले. मुदत संपल्यानंतरही या कर्जाचा भरणाच केला गेला नाही. त्यामुळे २३ जून रोजी बँकेच्या नगर येथील मुख्यालयात तारण सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता. या लिलावात सहभाग घेण्यासाठी सराफ जमले होते. सोन्याच्या ३६४ पिशव्यांचा लिलाव होता; मात्र पहिल्या पाच पिशव्या उघडताच त्यात सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने निघाले. त्यानंतर लिलावाची प्रक्रिया लगेच थांबविण्यात आली. बँकेतील अधिकाऱ्यांनी उर्वरित पिशव्यांमधील सोन्याची तपासणी केली तेव्हा ३६४ पैकी साडेतीनशेहून अधिक पिशव्यांमधील सोनेही बनावट असल्याचे आता समोर आले आहे.
---------------------
अपहार समोर आला मात्र कारवाई झाली नाही
अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे शाखाधिकारी यांनी बँक प्रशासनाला पत्र देऊन शाखेत २०१८ पासून संशयास्पद सोने तारण व्यवहार होत असल्याची कल्पना दिली होती; मात्र संचालक मंडळ व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर काहीच कार्यवाही केली नाही. बँकेचे सभासद राजेंद्र गांधी यांनी या अपहाराबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी वारंवार मागणी केली होती. त्यांच्या मागणीची मात्र दखल घेण्यात आली नाही. या अपहाराकडे दुर्लक्ष करणारे संचालक आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे बँकेच्या खातेदारांचे लक्ष लागून आहे.
----------------
बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट आढळले आहे. पंचनामा झाल्यानंतर सर्व तपशील समोर येईल. याबाबत अहवाल संचालक मंडळासमोर ठेवून दोषी असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
- महेंद्र कुमार रेखी, प्रशासक, नगर अर्बन बँक
..............