गेल्या अकरा महिन्यांपासून म्हाळादेवी भागात कालवे खोदाईची कामे प्रगतीपथावर आहेत. कालव्याच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही नुकसानभरपाई मिळावी ही प्रमुख मागणी आहे. पाईपलाईन तुटल्याने सध्या पिके जाळून गेली आहेत. शेतकऱ्यांनी अकरा महिन्यात पाच वेळा आंदोलने छेडली, पण केवळ आश्वासने पदरात पडली आहेत.
१ जानेवारी २०२१ला जलसंपदा विभागाच्या बैठकीत २० जानेवारी २०२१पर्यंत नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना अदा करू, असे आश्वासित करण्यात आले होते. सरकारने शब्द पाळला नाही म्हणून आंदोलन सुरु केल्याचे आंदोलक शेतकरी सुभाष हासे, पवन हासे, बंडूदादा हासे, रामदास हासे, प्रकाश हासे, गणेश हासे, जनार्धन हासे, अमोल हासे, आनंद हासे, नाथू उघडे, अनिल मुंढे, दिनेश हासे, देवचंद हासे, सुरेश मुंढे, सदाशिव हासे आदींनी सांगितले.
अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे कालवे खोदाईमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी नियामक मंडळाने १कोटी ८४ लाख रुपये निधी मंजूर केले असे सरकारी अधिकारी सांगतात. मग शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानभरपाईचे पैसे देण्याचे घोडे अडले कुठे ? हा प्रश्न आहे.दरम्यान, गुरुवारी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता तथा सहसचिव डॉ.संजय बेलसरे आणि अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांनी अकोलेत येऊन कालवे खोदाई कामाची पाहणी केली.
...........
म्हाळादेवी जलसेतू व २७ किलोमीटरचा डावा कालवा पूर्ण फिरून पाहणी केली .नियामक मंडळाने १ कोटी ८४ लाख रुपये मंजूर केले असून अंदाजे दोन-तीन दिवसात तोडगा निघेल आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल.
-प्रमोद माने,सहायक अभियंता
( २१ निळवंडे)