संगमनेर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरली आहे. शेतकऱ्यांनी शंभर टक्के वसुलीची परंपरा यंदाही कायम ठेवत मार्चअखेर थकबाकी भरावी. नियमित कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथे गुरूवारी (दि. १८) जिल्हा बँकेच्या शाखांच्या आढावा बैठकीत कानवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे होते. तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, वसुली अधिकारी यु.के. शिंदे, तालुका सचिव प्रकाश कडलग आदी उपस्थित होते.
जिल्हा बॅँकेने शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. संगमनेर व अकोले तालुक्याची शंभर टक्के वसुलीची परंपरा शेतकऱ्यांनी यंदाही कायम ठेवावी. जे शेतकरी नियमित कर्जदार असतील त्यांना नवीन योजनांचा लाभ मिळणार आहे, असेही ॲड. कानवडे म्हणाले.
तालुका विकास अधिकारी थोरात म्हणाले, जिल्हा बँकेने अत्यंत चांगले काम केले असून मागील वर्षी १८३ कोटींचे कर्जवाटप केले आहे. त्यापैकी फेब्रुवारी २०२१ अखेर २९ कोटी वसुली झाली आहे. या वर्षात शंभर टक्के वसुली देत आपल्या परंपरा कायम ठेवायचे आहे. कर्जवसुली करताना शासकीय नियमांचा आधार घेत सभासदांना व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. याची काळजी घेण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन वसुली अधिकारी शिंदे यांनी केले. तालुका सचिव कडलग यांनी आभार मानले.