श्रीरामपूर : तालुक्यातील महांकाळवाडगाव येथील बाळासाहेब मच्छिंद्र खुरूद (वय ४३) या शेतकऱ्याने नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली.गोदावरी नदीकाठचा हा परिसर आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यात अडचणी येत होत्या. शेतीतून कुठलेही उत्पन्न मिळत नसल्याने ते चिंतेत होते. पत्नीच्या नावे सेवा संस्थेची थकबाकी आहे. त्यातच खासगी वित्त पुरवठा करणाºया कंपन्यांकडील कर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळे गेली काही दिवस बाळासाहेब प्रचंड तणावाखाली होते. राहत्या घराजवळच विष प्राशन करून त्यांनी जीवनयात्रा संपविली.कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांना तातडीने श्रीरामपूर शहरात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून लोणी येथे प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या आई ताराबाई या गावच्या सरपंच होत्या.