पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:17 AM2021-07-17T04:17:20+5:302021-07-17T04:17:20+5:30

पुणतांबा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र यंदा राहाता तालुक्यात पाहायला मिळाले. १५ जुलै ही विमा ...

Farmers turn to crop insurance scheme | पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

पुणतांबा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र यंदा राहाता तालुक्यात पाहायला मिळाले. १५ जुलै ही विमा भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर २३ जुलैपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. तरीदेखील ऑनलाईन विमा केंद्रावर तुरळक शेतकरीच विमा भरताना दिसत आहेत.

मागील वर्षी नुकसान होऊनही विमा कंपनीने विमा मंजूर केला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत यंदा विमा न भरण्याचा निर्णय घेत नुकसान सहन करण्याची तयारी केली आहे. विमा कंपनीच्या जाचक अटी यासाठी कारणीभूत आहेत. शेतीचे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत विमा कंपनीला मेलद्वारे किंवा टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. पण यासाठी आवश्यक यंत्रणा, नोंदणी करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नाही. नुकसान होऊनही जर विमा मिळत नसेल तर विमा का भरावा ? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. मागील वर्षी केंद्र सरकारने विमा कंपनीला रक्कम अदा केली होती. मात्र, नुकसान होऊनही बहुतेक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. राज्य सरकारने या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने विमा कंपनीला याचा फायदा झाला व शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.

........

शंभरातील सात जण भरताहेत विमा

शंभरपैकी सहा ते सात शेतकरी विमा भरण्यास उत्सुक असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. मागील वर्षी आपले सरकार केंद्रावर कमीत कमी एक लाख रुपयांचा प्रीमियम जमा होत असे. यावर्षी त्याच केंद्रावर ३० ते ३५ हजारांचा विमा प्रीमियम १५ जुलैपर्यत जमा झाल्याचा आकडा आहे. त्यावरून पीकविमा भरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता जाणवत असल्याचे आपले सरकार केंद्र चालकांशी बोलताना कळते.

.............

कृषी विभागाकडूनही वारंवार जाहिराती, वैयक्तिक फोन करूनही शेतकरी विमा भरण्यास तयार नाहीत. यावर्षी पुणतांबा परिसरात पावसाने दडी मारल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या उशिरा झाल्या आहेत. तालुक्यात एकूण खरिपाचे क्षेत्र २ हजार २९२ आहे.

- योगेश डाखे, कृषी सहाय्यक, पुणतांबा

......

सलग तीन वर्षे विमा भरत असताना पहिल्या वर्षी दुष्काळ पडल्याने विमा मंजूर झाला. मागील दोन वर्षांपासून नुकसान होऊनही विमा मिळाला नसल्याने यावर्षी विमा उतरवला नाही.

- गोकुल बोर्डे, शेतकरी, पुणतांबा

.......................................................................................

मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार बंद असतानाही पीक विमा भरला. जास्त पावसाने नुकसान होऊनही नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसल्याने यावर्षी विमा भरण्याची इच्छा नाही.

- मधुकर पेटकर, शेतकरी, पुणतांबा

.......

मागील वर्षी राहाता तालुक्यातील अंदाजे एकूण ३० हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत सहभाग घेतला होता.

राहुल गवळी, विमा प्रतिनिधी

Web Title: Farmers turn to crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.