आगीत १९ कोटी ९६ लाखांचा माल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:58+5:302021-04-29T04:15:58+5:30
मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गोदामाच्या मागील बाजूला आग लागल्याचे काही स्थानिकांच्या लक्षात आले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर काही ...
मंगळवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गोदामाच्या मागील बाजूला आग लागल्याचे काही स्थानिकांच्या लक्षात आले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच संगमनेर नगर परिषद व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखानाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बाजार समितीत दाखल झाल्या. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर प्रवरानगर, शिर्डी, राहाता, सिन्नर (जि. नाशिक), श्रीरामपूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्याही बोलावण्यात आल्या. गोडाऊनच्या चारही बाजूंनी पाण्याच्या मारा करूनही आग आटोक्यात येत नव्हती. गोदामात कापसाच्या गाठी असल्याने आग अधिकच भडकत होती. रात्री साडे दहाच्या सुमारास जेसीबीने गोदामाच्या चारही बाजूच्या भिंती तोडून पाण्याचा मारा सुरू होता. तब्बल १७ तास उलटूनही बुधवारी दुपारी साडेचारपर्यंत आग शमली नव्हती. आग शमविण्याचे अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू होते.
--------------------
आगीत जळालेला माल
कापसाच्या गाठी - १३ हजार १६५, एकूण किंमत १७ कोटी ३७ लाख
चना - २ कोटी १३ लाख
मिरी - २५० पोते (५० रुपये किलोप्रमाणे)
सोयाबीन - २४२ पोते, एकूण किंमत ५ लाख
गहू - २१० पोते, एकूण किंमत २ लाख
बाजरी - १४०० पोते, एकूण किंमत ७ लाख
---------------------
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या गोदामात साठविण्यात आलेल्या मालाला शंकर टक्के विमा संरक्षण होते. अजूनही आग सुरू असून ती शमविण्याचे अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू आहेत.
- सतीश गुंजाळ, सचिव संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, संगमनेर