श्रीरामपूर : श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा शिवारात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना शहर पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. आरोपींमध्ये तालुक्यातील सोमनाथ उर्फ गणेश बापूसाहेब हळनोर (वय २६, चांडेवाडी, फत्याबाद), रवींद्र भाऊसाहेब थोरात (वय २४, कुरणपूर, ), विलास मुक्ताजी हाळनागर (वय ३०, रा.चांडेवाडी), सतीश लहानू चांडे (वय २१, चांडेवाडी), शाहीद इस्माईल पिंजारी (वय १९, चांडेवाडी) यांचा समावेश आहे. यातील सोमनाथ हळनोर याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर काही दरोडेखोर दरोड्याच्या उद्देशाने एका पांढºया रंगाच्या कारमधून (एमएच १२ बीव्ही १५४८) जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा लावला. खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी पोलिसांना चकवा दिला. अखेर पाठलाग करत एसटी कार्यशाळेसमोर कार अडवली. त्यातील सहा आरोपींनी धूम ठोकली. पोलिसांनी पाच जणांना पाठलाग करून पकडले. एक जण मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला.वाहनाची तपासणी केली असता त्यात मिरची पूड, लाकडी दांडके, गज व दोरी आढळून आली. पोलीस पथकात पोलीस नाईक अप्पासाहेब ओरगिसे, हवालदार शरद अहिरे, सुनील शिंदे, रमीज आत्तार यांचा समावेश होता.