फुलशेतीने मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:14 AM2018-06-15T11:14:20+5:302018-06-15T11:14:39+5:30

फुलशेती ही शेतकऱ्याला चांगलीच मालामाल करु शकते. पण यासाठी सेंद्रिय पध्दतीची शेती करणे गरजेचे आहे. असे केले तर कमी खर्चात जादा पैसे मिळू शकतात.

Flowers! | फुलशेतीने मालामाल!

फुलशेतीने मालामाल!

यमन पुलाटे
फुलशेती ही शेतकऱ्याला चांगलीच मालामाल करु शकते. पण यासाठी सेंद्रिय पध्दतीची शेती करणे गरजेचे आहे. असे केले तर कमी खर्चात जादा पैसे मिळू शकतात. गेल्या २० वर्षापासून दुर्गापूर (ता. राहाता) येथील शेतकरी लक्ष्मण पुलाटे हे फूल शेती करीत असून ती त्यांना फायदेशीर ठरत आहे.
दुर्गापूर (ता.राहाता) येथील लक्ष्मण देवराम पुलाटे हे मागील वीस वर्षांपासून बिजली, शेवंती, गलांडा आणि झेंडूची फुलशेती करतात. सुरुवातीला अनेक प्रश्न त्यांना आले. पण बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्रातील विस्तार विभागाचे प्रमुख सुनील बोरुडे यांनी या फूल उत्पादकांना एकत्र करीत गटांची स्थापना केल्याने फुलशेतीला चांगले दिवस आले असे लक्ष्मण पुलाटे यांनी सांगितले. येथील शास्त्रज्ञ पुरुषोत्तम हेंद्रे, भरत दंवणे, शांताराम सोनवणे यांनी लागवड, खत व्यवस्थापन, पिक संरक्षण, बाजारपेठ याची माहिती दिल्याने फूल शेतीला चांगले दिवस आले. आज या शेतीच्या माध्यमातून फूल शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर सध्या भर दिल्याने पूर्वीपेक्षा खर्चात ३० ते ४० टक्के बचत झाली आहे.
झेंडू पिकांची लागवड जून-जुलै, डिसेंबर-जानेवारी अशा दोन वेळेस करता येते. लागवडीपूर्वी चांगली मशागत करुन चार फुटांच्या बेडवर एक टन गांडूळ खत, निंबोळी पेंड याबरोबर जैविक बुरशीनाशके आणि जिवाणू खतांचा वापर करुन लागवड केली जाते. प्रत्येकवेळी लागवडीपूर्वी माती परीक्षण करुन ८० टक्के सेंद्रिय खते तर १० टक्के रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे खर्चात बचत, फुलांची गुणवत्ता, झाडांची वाढ चांगली होते. लागवडीनंतर दोन तोडणीनंतर व्हर्मीवॉश आणि शेण-गोमूत्र स्लरीचा आलटून-पालटून ठिंबक आणि फवारणीतून वापर करतो. गरज असेल तर विद्राव्य खतांचा वापर करतो. शेवंती आणि बिजली हे स्थानिक वाण तर झेंडूसाठी आफ्रिकन येलो,गोल्ड स्पॉट, अप्सरा येलो या वाणांचा वापर केला जातो.
ऊस पिकांत देखील झेंडूची फुलशेती फायदेशीर असून मागील दोन वर्षापासून हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरत आहे. बाजारपेठ आपल्या हातात नाही, पण गुणवत्ता, उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढविणे हे आपण केले तर पिक फायदेशीर ठरते.
झेंडू पिकांसाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो आणि यापासून सरासरी ८-१० टन उत्पादन मिळून खर्च वजा जाता ७० ते ७५ हजाराचा नफा होतो, असे लक्ष्मण पुलाटे यांनी सांगितले.

 

Web Title: Flowers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.