कोरडगाव : भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडी (ता. पाथर्डी) ग्रामपंचायतीमध्ये समावेश असलेल्या भगवानगड तांड्यावरील महिलांची कोराना काळामध्ये पुन्हा पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. लहान मुले तसेच महिलांना चार किमी अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.
भगवानगड तांडा येथे एक हजाराहून अधिक लोकसंख्या आहे. सध्या पाणी टंचाई निर्माण झाल्याने महिला, मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथे ऊस तोडणी करणाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. बरेचसे ऊस तोडणी करणारे कामगार गावाकडे परतले आहेत. हा तांडा काहीसा उंचावर आहे. त्यामुळे येथे पाण्याची दुसरी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय महिला, मुलांकडे पर्याय नसतो. चार किमीवरील दैत्यनांदूर येथील शेतकऱ्यांच्या विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याने डोक्यावर हंडा घेऊन येणारे ही मुले भर उन्हामध्ये चालताना दिसत आहेत.
--
ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिल्यानंतर या ठिकाणी इतर उपलब्ध सुविधा तपासून टँकरचा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल.
-शाम वाडकर,
तहसीलदार, पाथर्डी
--
भगवानगड तांड्यावरील रहिवासी हे ऊसतोडणी व कोळशाची कामे करून परतत आहेत. सध्याची परिस्थिती पाहून तत्काळ टँकर सुरु करावेत. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यायला हवे.
-दादासाहेब खेडकर,
जिल्हाध्यक्ष, वंचित ऊसतोड मजूर कामगार आघाडी