शिर्डी : जेवढ्या चुका काँग्रेसने पंधरा वर्षात केल्या तेवढ्या चुका मोदी व फडणवीस सरकारने दोन वर्षात केल्या असूनही जनता त्यांच्या फसव्या घोषणांमुळे भरडली जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. भाजप-सेना सत्तेसाठी खोटं-नाटं बोलतात व पैसा कमवतात त्यातून सत्ता मिळवतात. या दोघांचे खरे रूप जनतेला कळले असून गरिबांसाठी अच्छे दिन कधीच येणार नाहीत, असेही ते म्हणाले़ शनिवारपासून सुरू असलेल्या महिला कॉँग्रेस प्रशिक्षण शिबिराचा समारोप राणे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा शोभा ओझा होत्या़ यावेळी महाराष्ट्र प्रभारी नेटा डिसुझा, निलम राणे, अॅड. चारूलता टोकस, शालिनीताई विखे, दुर्गाताई तांबे, अंजली टापरे, विनायक देशमुख, सत्यजित तांबे, कांचन मांढरे, सरला पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़राज्य व केंद्रातील भाजपाचे सरकार मागील काँग्रेस सरकारच्या योजना नावे बदलून चालवत असल्याचे सांगत अच्छे दिन येणार नाहीत. आदेशाची वाट पाहू नका, महिलांनी सक्रिय व्हा, काँग्रेसची कामे गावागावात पोहचवा, येणाऱ्या स्थानिक निवडणुकांत आपली ताकद दाखवून द्या, केवळ सरकारवर टीका करून सत्ता मिळवण्याचे स्वप्न न पाहता कामाला लागण्याचा सल्ला राणे यांनी यावेळी दिला़ कुठल्याही पक्षाच्या नेत्याने आदेश देताना परिणामांचा विचार करावा, विधायक, सामाजिक कामांनी लोकप्रिय होता येते़ मराठी माणसाचं हित कोणी किती केलं, हे मुंबईच्या मराठी माणसाला माहीत आहे, असे म्हणत नाव न घेता राणे यांनी राज ठाकरे यांच्या रिक्षा जाळण्याच्या आदेशावर टीका केली. (तालुका प्रतिनिधी) संघाला ‘अच्छे दिन’आरएसएसने आता हाफऐवजी फुल पँट वापरण्याचा निर्णय घेतलाय, याचा अर्थ आरएसएसचे अच्छे दिन सुरू झालेत. मात्र गोरगरीब जनता आजही होरपळत आहे. पंतप्रधान गरीबाचे असल्याचे वाटतच नाही. आजही कुपोषण, शिक्षणाचे प्रश्न असताना मोदी मात्र अकरा लाखाचा सूट वापरतायत, अशी टीकाही नारायण राणेंनी केली.यावेळी शोभा ओझा यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्या असहिष्णुतेच्या वक्तव्यावर तोफ डागली. कॉँग्रेस जर असहिष्णु असती तर अनुपम खेर यांच्या वक्तव्यानंतर आतापर्यंत त्यांचे हातपाय तुटले असते. कॉँग्रेस महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवर चालते, नथुराम गोडसेच्या नाही. कॉँग्रेसमध्ये त्यागाची परंपरा आहे. खोट्या व्हिडीओ क्लिप बनवून विद्यार्थ्यांना जेलमध्ये टाकणे किंवा दलिताला आत्महत्येस परावृत्त करणे, असे कॉँग्रेस कधीच करत नाही, अशी टीका यावेळी ओझा यांनी भाजपावर केली.
सरकारच्या फसव्या घोषणांनी जनता भरडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 11:51 PM