कचरा डेपोतील वृक्षलागवडीला रोख निधीची पालवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:18 AM2021-04-05T04:18:41+5:302021-04-05T04:18:41+5:30
अहमदनगर : शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाचा काही निधी वृक्षलागवडीसाठी राखीव होता. हा निधी तीन वर्षे महापालिकेच्या तिजोरीत पडून होता. ...
अहमदनगर : शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाचा काही निधी वृक्षलागवडीसाठी राखीव होता. हा निधी तीन वर्षे महापालिकेच्या तिजोरीत पडून होता. सभागृहात सदस्यांकडून विषय उपस्थित करताच बुरुडगाव व सावेडी या दोन्ही कचरा डेपोंतील वृक्षलागवड ठेकेदारांनी परस्पर उरकली. त्यामुळे कचरा डेपोतील वृक्षलागवडीला रोख निधीची पालवी फुटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
कचरा डेपोतून होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी सावेडी व बुरुडगाव या दोन्ही कचरा डेपोंत हरितपट्टा विकसित करण्याचे काम प्रस्तावित होते. हे काम सन २०१७ मध्ये प्रस्तावित करण्यात आले होते. महापालिकेने हे काम ए. जी. वाबळे यांना दिले होते. मात्र कचरा डेपोत जागा उपलब्ध होत नसल्याचे कारण देत तीन वर्षांत वृक्षलागवड केली गेली नाही. महापालिकेने या ठेकेदाराला वेळोवेळी मुदतवाढ दिली. दरवर्षी १० टक्के वाढ होते. ती मिळावी, अशी मागणी ठेकेदाराकडून केली गेली नाही. तीन वर्षांपूर्वीच्याच दराने ठेकेदाराने वृक्षलागवडीचे काम मागील दोन महिन्यांत उरकले. शहरातील वृक्षलागवडीबाबत महापालिकेच्या सभागृहात वेळोवेळी चर्चा झालेली आहे. नगरसेवकांनी या विभागाचे वाभाडे काढले. असे असताना उद्यान विभागाने परस्पर वृक्षांची नावे निश्चित केली. बुरुडगाव कचरा डेपोत तर दोन-तीन फुटांची झाडे लावली गेली. त्यानंतर सावेडी कचरा डेपोत वृक्षलागवड केली गेली. सावेडी कचरा डेपो प्रभाग क्रमांक १ मध्ये येतो. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर हे या प्रभागाचे नेतृत्व करतात. त्यांनाही या वृक्षलागवडीबाबत माहिती नव्हती. त्यांनी सभागृहात सावेडी कचरा डेपोत झाडे लावली का, असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना देता आले नाही. त्यावर सावेडी कचरा डेपोत मोठी झाडे लावायची आहेत. महापौरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार असल्याचे बारस्कर यांनी जाहीर केले होते. परंतु, त्यापूर्वीच ठेकेदाराने परस्पर झाडे लावली असून, या वृक्षलागवडीवर लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे.
....
नियम धाब्यावर बसवून केली वृक्षलागवड
वृक्षलागवडीबाबत वन विभागाचे काही नियम असतात. कुठली झाडे किती अंतरावर लावायची, याबाबत वनविभागाकडून मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार झाडांची लागवड केली जाते. परंतु, बुुरुडगाव आणि त्यानंतर सावेडी कचरा डेपोत वन विभागाचे मार्गदर्शन न घेताच वृक्षलागवड करण्यात आली. याबाबत उद्यान विभागाचाही कोणताही अक्षेप नाही, हे विशेष!
.....
०४ बुरुडगाव डेपो