कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची ससेहोलपट सुरू आहे. नगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत मृतदेह असतानाच मृतांचीही संख्या वाढत चालली आहे. एकट्या श्रीगोंदा तालुक्यात दररोज शंभरच्या वर रुग्णांची भर पडत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्हाभर हीच परिस्थिती असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळच्या निवडणुकीत व्यस्त आहेत.
कोरोनाविरोधातील लढाई तीव्र करण्यासाठी प्रशासनाच्या अन्य विभागांनीही आरोग्य विभागाला साथ देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचे अथवा राज्य सरकारच्या अन्य विभागाचे कर्मचारी कोरोना लढाईविरोधी वापरले तर चांगली मदत होणार आहे. जिल्हाभर प्रशासकीय पातळीवर सावळा गोंधळ दिसून येत आहे. कोरोना रुग्णांसह नातेवाइकांना दिलासा देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर समन्वय राखण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा ठराविक निधी कोरोनाचे संकट रोखण्यासाठी दिला पाहिजे. तसा निर्णय नियोजन मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला पाहिजे. समन्वय साधण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी वेळ द्यावा अन्यथा जिल्ह्याचे 'पालकत्व' अन्य मंत्र्यांकडे सोपविण्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळ आणि जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांनी केली आहे.