पिकांचे नुकसान सांगताना गहिवरले शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:20 AM2021-03-22T04:20:09+5:302021-03-22T04:20:09+5:30
तिसगाव : वादळ, अवकाळी पाऊस, गारपिटीने गहू, कांदा, डाळिंब आदी पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. खरीप हंगामातील नुकसानीनंतर ...
तिसगाव : वादळ, अवकाळी पाऊस, गारपिटीने गहू, कांदा, डाळिंब आदी पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. खरीप हंगामातील नुकसानीनंतर पुन्हा रब्बीच्या अखेरीसही पावसाने केलेल्या नुकसानीची आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना माहिती सांगताना शेतकरी गहिवरले.
शनिवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वृद्धेश्वर कारखाना (ता. पाथर्डी) परिसरातील चितळी, पाडळी अशा १५ ते २० गावांतील शेकडो एकर क्षेत्रावरील कांदा, केळी, डाळिंब, गहू, हरभरा, मका, टरबूज, चिंच, आंबा, घास आदी पिकांचे नुकसान झाले.
रविवारी आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी नुकसानग्रस्त चितळी, पाडळी, साकेगाव, काळेगाव, सुसरे, पागोरी पिंपळगाव, सोमठाणे, सांगवी, प्रभुपिंपरी, माळेगाव, निपाणी जळगाव, कोरडगाव, कळसपिंप्री, आखेगाव, ढवळेवाडी या गावात पाहणी केली.
साकेगाव येथे केळी, टरबूज, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. सुसरे येथे चिंच, कांदा पिकाला जबर फटका बसला. पागोरी पिंपळगाव, प्रभू पिंपरी येथे कांदा, गहू, हरभरा, लिंबू, संत्रा, मोसंबी, डाळिंब पिकांचे नुकसान झाले. डांगेवाडी येथे आंब्याच्या बागेत कैऱ्यांचा खच पडला.
मोहरही गळून गेला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपिटीमुळे हिरावला गेला. लाखोंचा खर्च वाया गेला. नुकसानीबाबत माहिती सांगता शेतकऱ्यांना गहिवरून आले.
यावेळी जि. प. सदस्य राहुल राजळे, गोकुळ दौंड, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, जमीर आतार, राजेंद्र दराडे, बंडू नागरे, उद्धव घनवट, अबूभाई पटेल, आप्पासाहेब सातपुते, साहेबराव सातपुते, नितीन सातपुते उपस्थित होते.
काळेगाव येथील चंदा मोहन सातपुते या महिलेचे घर वादळात पडल्याने तिचा संसार उघड्यावर आला. आमदार राजळे यांना घडलेली परिस्थिती सांगताना सातपुते यांना आश्रू अनावर झाले.
--
महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरवात केली आहे. पंचनामे करून सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविला जाईल. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी यासाठी सरकारकडे आग्रह धरणार आहे.
- मोनिका राजळे, आमदार, शेवगाव-पाथर्डी
---
२१ तिसगाव पाहणी
चितळी, पाडळी परिसरात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना आमदार मोनिका राजळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण व इतर.