साईनगरीतील गणपती बाप्पा झाले ऐंशी वर्षांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:49 PM2019-09-08T12:49:22+5:302019-09-08T12:50:05+5:30
साईनगरीतील बाप्पा यंदा ऐंशी वर्षाचे झाले आहेत. शिर्डीतील शाळा मास्तरांनी १९३९ साली शाळेतील मुलांकडून साईनगरीतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा करवून घेतला होता.
प्रमोद आहेर
शिर्डी : साईनगरीतील बाप्पा यंदा ऐंशी वर्षाचे झाले आहेत. शिर्डीतील शाळा मास्तरांनी १९३९ साली शाळेतील मुलांकडून साईनगरीतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा करवून घेतला होता.
१६ सप्टेंबर १९३९ ते मंगळवार २६ सप्टेंबर १९३९ दरम्यान शिर्डीतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. शिर्डीतील सर्व शाळा मास्तरांनी मिळून शाळेतील मुलांकडून हा गणेशोत्सव साजरा करून घेतला. यात साईबाल मेळावा साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीपासून दहा दिवस व्याख्यान, पोवाडे, भजन, गायन, नाट्यप्रयोग असे कार्यक्रम घेण्यात आले. २६ सप्टेंबर रोजी श्रीगणेशाची मिरवणूक काढून खोबरे, खडीसाखर, डाळ वाटून गणपती विसर्जन करण्यात आले.
या पहिल्या गणेशोत्सवाचे साक्षीदार असलेल्या स्वर्गीय नानासाहेब जगताप यांच्या सांगण्यानुसार त्यावेळी मारूती मंदिराशेजारी शाळा भरत असे. गणपती मात्र जुन्या चावडी (खुले नाट्यगृह) शेजारी रावसाहेब तात्याजी गोंदकरांच्या सध्या असलेल्या जागेत बसवण्यात आला होता. यावेळी नरहर अनंत पिटके शाळेचे हेडमास्तर तर आमले, परदेशी आदी शिक्षक होते. या गणेशोत्सवात संभाजी महाराजांवर नाटक बसवण्यात आले होते. यात आमले मास्तरांनी संभाजीची भूमिका केली होती. त्यावेळी रामचंद्र सजन कोते, रहेमान भिकन दारूवाले, सखुबाई चिमाजी सजन, शंकर कचरू शेजवळ, रामराव ठमाजी शेळके, रामचंद्र कचरदास लोढा, रावसाहेब तात्याजी गोंदकर, तुळशीराम निवृत्ती गोंदकर तसेच रूई येथील तात्या शंकर वाणी, ताराचंद शंकर कडू, रामराव विठ्ठलराव वाबळे, बाजीराव वाबळे आदी विद्यार्थी होते.
या उत्सवांची परंपरा रोहम गुरूजींनी पुढे सुरू ठेवली. ते शाळेत गणेशोत्सव साजरा करत. कार्यक्रमाबरोबरच ग्रामस्वच्छताही असे़ याच काळात ३० आॅगस्ट, १९६५ पासून संस्थान कर्मचा-यांनीही दीक्षित वाड्यात गणेशोत्सवास सुरुवात केली. १९६२ ते १९६७ दरम्यान सरपंच रावसाहेब गोंदकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून हा उत्सव साजरा झाला़ यात हरिभाऊ शेळके, बाजीराव कोते, राजाराम कोते, देवराम शेळके, शालीग्राम नागरे, सोपान कोते, ज्ञानेश्वर शेळके आदींचा सहभाग असे. १९६७ साली देणगी नाकारल्यामुळे पन्नालाल तोडरवाल या व्यापाºयाच्या घरावर गावाने बहिष्कार टाकला. यानंतर तीन वर्षे सार्वजनिक गणपतीच बसवण्यात आला नाही.
नंतरच्या काळात सरपंच मुकुंदराव कोते, उपसरपंच भानुदास गोंदकर, गणपत ठमाजी शेळके, गोविंद शंकर कोते, ज्ञानदेव निवृत्ती गोंदकर आदी सार्वजनिक गणपती बसवत़ १९७१ च्या सुमारास दुष्काळात सार्वजनिक गणपती बसवू नये व वर्गणी गोळा करू नये, अशी दवंडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात आली़ यावर बाबूराव पुरोहित, रामनाथ निर्मळ, विठ्ठलराव शिंदे, अशोक जगताप, जव्हेरीशेट संकलेचा, देवराम बन्सी कोते, विठ्ठल शेळके, शामलाल गंगवाल, संपतकाका गोंदकर, सूर्यभान निवृत्ती कोते, सर्वोत्तम कुलकर्णी आदी तरुणांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीचा निर्णय धुडकावत २५ आॅगस्ट १९७१ रोजी चावडी मंदिरासमोर व अब्दुलबाबा झोपडीच्या पश्चिमेस गणेश स्थापना केली. या गणेशोत्सवातच सन्मित्र युवक मंडळाची स्थापना झाली़आता ३० पेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत़