औरंगाबाद महामार्गावर कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:13+5:302021-02-24T04:22:13+5:30
अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना ...
अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन्ही बाजूने व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामुळे नगरमध्ये प्रवेश करताच प्रवाशांना घाणीचेच दर्शन होत असून, यामुळे नगर शहराची प्रतिमा डागाळली जात आहे. याकडे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
नगर-औरंगाबाद महामार्ग नगर शहरातून जातो. शहरातील तपोवन रस्त्यापासून महापालिकेची हद्द सुरू होते. तपोवन रस्त्यापासून ते वसंत टेकडी या भागात महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. झाडाझुडपांमध्ये मृत जनावरे टाकली जात आहेत. तसेच महामार्गावर व्यवसाय करणारे व्यावसायिकदेखील कचरा आणून टाकतात. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कचराच-कचरा, अशी परिस्थिती आहे. महामार्गावर अतिक्रमणे आहेतच. त्यात आता भर पडली आहे ती कचऱ्याची. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तर दुर्लक्ष आहेत. परंतु हा परिसर महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतो. महापालिकेमध्ये सध्या स्वच्छ भारत अभियान जोरात सुरू आहे. शहरातील ठिकठिकाणी स्वच्छता केली जात आहे. परंतु महामार्गाकडे मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करताच प्रवाशांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नगर-औरंगाबाद महामार्गावर पुणे ते औरंगाबाद या शहरातील वाहनांची ये-जा असते. या प्रवाशांना नगर शहरात प्रवेश करताच दुर्गंधीला सामोरे जावे लागते. नगर शहराची प्रतिमा यामुळे डागाळली जाते.
.....
महामार्गांच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची?
नगर शहरातून औरंगाबाद, पुणे, कल्याण, सोलापूर, मनमाड असे महामार्ग जातात. हे महामार्ग महापालिका हद्दीतून पुढे जातात. हे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असले तरी ते महापालिका हद्दीतून जातात. या दोन्ही यंत्रणा महामार्गाशी संबंधित आहेत. परंतु, महामार्गाच्या स्वच्छतेबाबत या दोन्ही यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.