अहमदनगर : ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांची धुरापासून मुक्तता करण्यासाठी मोदी सरकारने जिल्ह्यातील महिलांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलेंडर मोफत दिले. नंतरची रिफिलिंग मात्र संबंधित लाभार्थ्याला करायची होती. आता गॅस सिलेंडरची किंमत आठशे रुपयांपर्यंत गेल्याने गोरगरीब महिला पुन्हा चुलीकडे वळाल्या आहेत. महागाई पेक्षा धूर परवडला, अशाच संतप्त भावना महिलांनी व्यक्त केल्या.
स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने १ मे २०१६ पासून हानिकारक रॉकेल, धूर विरहित लाकूड इंधन, गोवऱ्या इत्यादींमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्ती देण्यासाठी, महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना सुरू केली होती. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस सिलिंडर, रेग्युलेटरसह वाटप करण्यात आले होते. मात्र, या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या मजूर कुटुंबांना त्याच्या वाढत्या किमती परवडत नसल्याने गॅस सिलेंडर अडगळीत टाकावे लागले आणि पुन्हा चुली पेटवाव्या लागल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही परिस्थिती दिसते आहे. एकीकडे रॉकेल बंद झाले आहे, तर दुसरीकडे गॅस महाग झाल्याने ग्रामीण भागातील महिलांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे चूल पेटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
---------
हातांना मिळेल ते काम करून मोलमजुरी करायची. कुटुंबाचा उदारनिर्वाह करायचा. सध्या कोरोनामुळे काम मिळत नाही. महिन्याला कसेबसे तीन हजार रुपये मिळतात. त्यात गॅससाठी आठशे रुपये द्यायला परवडत नाही. सरकारने गरिबांसाठी मोफत गॅस द्यायला पाहिजे.
- शालनबाई गायकवाड, नागरदेवळे
------------
दिवसभर उन्हात मजुरी करावी लागते. गरिबांना महागाईचा गॅस कसा घ्यायचा. सरपण मिळत नाही. दहा रुपये किलोने सरपण घ्यावे लागते. सध्या चिंच उतरावयाचे काम करतो. दोनशे ते अडीचशे रुपये रोजाने काम मिळते. एक महिन्यांनी हे काम ही मिळणार नाही. सध्या ८५० रुपयांना सिलेंडर मिळते. आम्ही गरिबांनी कसे जगावे हेच कळत नाही.
- लताबाई भिंगारदिवे, नागरदेवळे
---------------
गॅसचे दर
डिसेंबर- ६८२.५० रुपये
जानेवारी- ७३२.५० रुपये
फेब्रुवारी- ७८२.५० रुपये
--------
पंतप्रधान उज्ज्वला गॅसचे लाभार्थी (दक्षिण)
१ लाख ३८ हजार
-----------
योजनेचा ताळमेळ नाही
जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचे किती सिलेंडर मोफत दिले, याबाबत यंत्रणेमध्येच समन्वय दिसला नाही. जिल्हा पुरवठा विभाग, कंपन्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि गॅस एजन्सी यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने ही योजना कधी सुरू झाली आणि कधी संपली, याबाबत कोणालाही अधिकृत माहिती देता आली नाही.
----------
नेट फोटो..............
सिलेंडर
२२उज्ज्वला गॅस डमी
---
फोटो- २२ नेवासा चूल
गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने ग्रामीण भागातील महिलांनी घरात गॅसपेक्षा चुलीवरच चहापाणी,स्वयंपाक करण्यास प्राधान्य दिले आहे. सोनई (ता. नेवासा) परिसरातील हे चित्र.
छायाचित्र- सुहास पठाडे