श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या बेलापूर येथील (जि. नगर) व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले असून त्यांच्याकडील पैसे लुटून नंतर हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत. याप्रकरणी नाशिक व नगर जिल्ह्यातून पाच आरोपींना अटक केली आहे. हिरण यांच्या जुन्या कामगारानेच हा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Gautam Hiran's murder by old worker; Five arrested)अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप मुरलीधर हांडे (२६, माळेगाव, जि. नाशिक), जुनेद ऊर्फ जावेद बाबू शेख (२५, रा. सिन्नर), अजय राजू चव्हाण (२६, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (२९, रा. उक्कडगाव, जि. नगर) व एका २२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. आरोपींकडून हिरण यांचा मोबाइल फोन तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हॅन जप्त करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी शनिवारी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. काही वर्षांपूर्वी हिरण यांच्याकडे एक व्यक्ती व त्याचा मुलगा दोघेही कामाला होते. या मुलाने आपली गाडी बंद पडल्याच्या बहाण्याने हिरण यांची मदत मागितली. एका दुकानदाराकडून गाडी दुरुस्तीचे साहित्य घेऊन हिरण त्याच्यासोबत दुचाकीवर गेले. पुढे रस्त्यात असलेल्या अन्य साथीदारांच्या मदतीने त्याने हिरण यांच्याकडील १ लाख ६४ हजार रुपये लुटले. हिरण आपणाला ओळखतील या भीतीपोटी आरोपींनी त्यांची हत्या केली.
सकल जैन समाजाकडून तपासासाठी पाठपुरावा- हिरण यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. - अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनही केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधिमंडळात आवाज उठविला होता. - त्यामुळे तपासाची चक्रे वेगाने फिरली. आरोपींना अटक झाल्याने जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
असा झाला गुन्ह्याचा उलगडाअपहरण घडले त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी मारुती व्हॅनमधून संशयास्पदरीत्या एका व्यक्तीला नेताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी व्हॅनचा शोध घेतला. ती नाशिक जिल्ह्यात मिळून आली. ती मूळ मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. या वाहनात हिरण यांच्या मोबाइलसह बँकेचे चेकबुक व पावत्या सापडल्या. गुन्हेगारांनी दहा ते पंधरा दिवस बेलापूर येथे रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे. अपहरण केल्यानंतर पसार होण्याचे मार्ग शोधण्यात आले होते.