राहाता : सोरट पान नावाचा जुगार खेळण्याच्या वादावरुन मारहाण केलेल्या आरोपीला पकडण्याकरीता गेलेल्या पोलिसावर गावगुंडानी हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळी झाली. राहाता येथील आठवडे बाजारात हीघटना घडली आहे .आज राहाता शहराचा आठवडे बाजार असल्याने नेहमीप्रमाणे सोरटपान नावाचा जुगार बाजारात सुरु होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या ठिकाणावरुन मुजीत रामनरेश केवठ (२५, रा. उत्तर प्रदेश) हा मजूर येथून जात असताना सोरटपानाचा जुगार लावणारे विकी चावरे, भावड्या शाक, प्रकाश आरणे (तिघेही राहणार राहाता) यांनी त्या मजुरास जबदस्तीने जुगार खेळण्याची जबरदस्ती केली. यातुन वाद होऊन या तिघांनी मजुरास मारहाण केली. त्यानंतर मजूर राहाता पोलिसात तक्रार देण्याकरीता गेला. याची दखल घेऊन राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक सुनिल रमेश मालकर (२६) यांना तपासाकरिता पाठवले. चौकशी करुन विचारपुस सुरु केली असता विकी चावरे, भावड्या शाक, प्रकाश आरणे यांनी या पोलिसावर जिवघेणा हल्ला करीत गंभीर जखमी केले. जखमीस शिर्डी येथे साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारा करीता भरती केले असून यातील मुख्य आरोपी विकी चावरे यास अटक केली आहे.
राहात्यामध्ये गावगुंडाची पोलिसास मारहाण : एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 7:30 PM