फेकून दिलेल्या अर्भकाला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:27 PM2019-07-13T17:27:47+5:302019-07-13T17:28:24+5:30
कुकाणा येथे नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या फेकून दिलेल्या अर्भकाला स्वयंसेविका ज्योती चित्ते यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले.
कुकाणा : कुकाणा येथे नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या फेकून दिलेल्या अर्भकाला स्वयंसेविका ज्योती चित्ते यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. सामाजिक कार्यकर्ते संदिप वाघ आणि कुकाणा आरोग्य केंद्राच्या आशा स्वंयसेविका ज्योती रमेश चित्ते यांच्या सतर्कतेमुळे फेकून दिलेल्या जिवंत नवजात अर्भकाला जीवदान मिळाले.
देवगाव रस्त्या लगतच्या नवीन वसाहतीच्या मागील बाजूस व मोठीवस्ती असलेल्या ठिकाणी शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान नाभिक समाजाचे कार्यकर्ते संदिप वाघ हे आपल्या बंगल्याच्या दुस-या मजल्यावर व्यायाम करत असताना बंगल्याच्या मागील बाजूने लहान बाळ रडण्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीसह खाली आले असता त्यांना तेथे एक स्त्री जातीचे नुकतेच जन्मलेले अर्भक दिसले. त्यांनी शेजारी राहत असलेल्या कुकाणा आरोग्य केंद्राच्या आशा स्वंयसेविका ज्योती रमेश चित्ते व पती रमेश चित्ते यांना याबाबत माहिती दिली. डॉ. समीर बाफना यांच्याशी संपर्क केला. तोपर्यंत चित्ते दाम्पत्याने त्या मुलीला घरात आणून स्वच्छ केले. त्यावेळी डॉ. बाफना यांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्भकाची तपासणी करून सुस्थितीत असल्याचे सांगितले. चित्ते व वाघ यांच्या मदतीने मुलीला हॉस्पीटल मध्ये घेवून आले. यावेळी डॉ. बाफना यांनी कुकाणा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी भाग्यश्री सारुक यांच्याशी संपर्क केला. त्यांनी त्वरीत डॉ. अरूण वाबळे, सुरेश थोरात, भिमा लवांडे यांच्या सहभेट देवून ते नवजात अर्भक ताब्यात घेतले. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून अहमदनगर येथील स्नेहालयाशी संपर्क साधला. कुकाणा पोलीस स्टेशन पोलीस नाईक संदिप गायकवाड, पो.कॉ. अशोक कुदळे यांनी घटनास्थळास भेट दिली.