पारनेर : निघोज येथील मळगंगा देवीच्या मुख्य यात्रेला रविवार (दि.८) एप्रिलपासून सुरु होत आहे. भाविकांच्या सुव्यवस्थेसाठी श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, विविध सहकारी, सामाजिक व सेवाभावी संस्थांनी स्वागताची जय्यत तयारी केली असून ठिकठिकाणी स्वागत कमाणी, सर्व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.रविवार सकाळी देवीचा अभिषेक, दुपारी बगडगाड्यांची मिरवणूक, मिरवणुकीची देवीच्या हेमांडपंथी बारवेजवळ विसर्जन झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता देवीला अंबिल वर्तविण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन, सायंकाळी ९ वाजता देवीच्या छबिण्याची मिरवणूक होणार आहे.दि.९ एप्रिलला सकाळी आठ वाजता चांदीच्या घागरीची मिरवणूक, दुपारी चार वाजता छबिण्याचे कुंडावर प्रयाण. रात्री ८ वाजता शोभेच्या दारूची आतषबाजी, १० एप्रिल रोजी दुपारी कुंडावर कुस्त्यांचा जंगी आखाडा, बुधवारी निघोज येथील शहा कादरीबाबांचा ऊरूस कार्यक्रम, सायंकाळी ८ वाजता संदल मिरवणूक, रात्री १० वाजता कांताबाई सातारकरसह मास्टर रघुवीर खेडकर यांचा तमाशा, १२ एप्रिल रोजी दुपारी ५ वाजता गावामध्ये कुस्त्यांचा आखाडा. १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मिरवणूक होणार आहे. यात्रेसाठी राज्यभरातून मळंगगा देवीच्या दर्शनासाठी येतात.