रिक्षाचालकांना शासनाचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:13 PM2019-07-13T17:13:36+5:302019-07-13T17:13:41+5:30
रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर पहिल्यांदाच शासनस्तरावर सकारात्मक चर्चा झाली आहे़ रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले
अहमदनगर : रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर पहिल्यांदाच शासनस्तरावर सकारात्मक चर्चा झाली आहे़ रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, या माध्यमातून रिक्षाचालकांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष वैभव जगताप यांनी व्यक्त केला़
महाराष्ट्रातील रिक्षाचालकांनी विविध प्रश्नांसाठी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी संप मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला़ या बैठकीची माहिती देण्यासाठी गुरुवारी जिल्हा रिक्षा पंचायतच्या वतीने बैठक घेण्यात आली.
जगताप म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळास चर्चेला बोलाविले होते़ यावेळी सकारात्मक चर्चा करुन काही आश्वासने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. फडणवीस यांनी रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळाचे आठ दिवसात गठण करुन कमिटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या कमिटीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर रिक्षा चालकांच्या तीन प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. ही कमिटी तीन महिन्यात कल्याणकारी मंडळाचा कृती आराखडा शासनाला सादर करेल. कल्याणकारी मंडळाकडून रिक्षा चालक-मालक यांना पेन्शन, मेडिकल, भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी आदी कल्याणकारी व वृद्धापकाळाची काळजी घेणाºया योजनांचा समावेश असणार आहे. या कल्याणकारी मंडळास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे तसेच अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याकरीता कायमस्वरुपी भरारी पथक नेमण्याचे परिवहन खात्याला आदेश देण्यात आले असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
बैठकीला संघटनेचे ताजुद्दीन मोमीन, समीर कुरेशी, शाहू लंगोटे, सचिन बडेकर, दत्तात्रय साबळे, गुलाम दस्तगीर, वाहिद शेख, बबन पाटोळे, विशाल खांडरे, राजू दहीहांडे, उस्मानखान पठाण, विजू शेलार, सागर काळभोर, नासीर पठाण, राहुल पवार, संतोष नामदे, दत्ता जाधव, निर्मल गायकवाड, सुलतान पठाण, फिरोज तांबोळी, सुनील पवार, उत्तम पाटोळे, सलीम शेख, गोरख शिंदे, संजय धाडगे, गणेश आखमोडे, विजू साळवे, शाहिद खान, अमजत मोमीन, अली शेख, तौसिफ शेख, फैरोज तांबटकर, सुरेश नगरकर, राजेंद्र टिपरे, संतोष गायकवाड, प्रथम गायकवाड आदी उपस्थित होते.