शासनाने दूध संघांकडून पूर्ण क्षमतेने दूध खरेदी करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:20 AM2021-04-21T04:20:59+5:302021-04-21T04:20:59+5:30
कोपरगाव : शासन पूर्ण क्षमतेने दूध स्वीकारत नसल्याने दुधावर प्रक्रिया करणारे दूध संघ व प्रकल्पांना अडचणीचा सामना करावा लागत ...
कोपरगाव : शासन पूर्ण क्षमतेने दूध स्वीकारत नसल्याने दुधावर प्रक्रिया करणारे दूध संघ व प्रकल्पांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही गंभीर परिस्थिती विचारात घेऊन शासनाने १०० टक्के दूध खरेदी करावे, अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परजणे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करण्याची वेळ सकाळी ७ ते ११ करण्यात आलेली आहे. वेळेच्या या बंधनामुळे दुधाची विक्री सुमारे ६० टक्क्यांनी तर दुग्धजन्य पदार्थांची विक्री ७५ टक्क्यांनी कमी झालेली आहे. याचा विपरीत परिणाम दूध संघांवर व दूध संकलन करणाऱ्या संस्थांवर झालेला आहे. संघाला माल पुरवठा करणारे व्यावसायिक तसेच दूध उत्पादकांची देणी, कर्मचाऱ्यांचे पगार, प्रक्रिया खर्च भागविणेही संघांना सध्या कठीण झालेले आहे.
ही परिस्थिती अशीच राहिली तर दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडण्याची आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या श्रमजीवी वर्गावर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. हजारो कुटुंबांचे संसार या व्यवसायावर अवलंबून आहे. दुग्ध व्यवसायाला व या व्यवसायाशी निगडित असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने १०० टक्के दूध स्वीकारणे गरजेचे असून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीच्या वेळेत देखील वाढ करण्याची आवश्यकता आहे.