पालकमंत्री राम शिंदेंनी नगर जिल्हा परिषदेचा निधी अडविला : कार्ले यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:15 PM2017-12-19T16:15:15+5:302017-12-19T16:20:46+5:30
जिल्हा परिषदेच्या ३० टक्के निधीला राज्य सरकारने कात्री लावली व उर्वरित निधी पालकमंत्र्यांनी अडविल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत होणारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामे गेल्या ८ महिन्यांपासून ठप्प आहेत.
केडगाव : जिल्हा परिषदेच्या ३० टक्के निधीला राज्य सरकारने कात्री लावली व उर्वरित निधी पालकमंत्री राम शिंदे यांनी अडविल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत होणारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामे गेल्या ८ महिन्यांपासून ठप्प आहेत. पालकमंत्री व भाजपाकडून जिल्हा परिषदेत जिरवाजिरवीचे राजकारण सुरु असून यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला.
सारोळा कासार (ता. नगर) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ व प्रभावी कामे करणा-या लोकसेवकांचा माजी आमदार दादा कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता असल्याने पालकमंत्र्यांकडून सुडाचे राजकारण सुरु आहे, परंतु या जिरवाजिरवीमध्ये विकास कामे ठप्प झाल्याने सर्व सामान्य जनता भरडली जात आहे, असा आरोप कार्ले यांनी केला. कार्यक्रमास शिवसेनेचे पारनेर तालुकाप्रमुख निलेश लंके, खडकीचे सरपंच प्रवीण कोठुळे, बाबुर्डी घुमटचे सरपंच जनार्दन माने, यशवंतराव धामणे, माजी सरपंच भानुदास धामणे, ग्रा.पं.सदस्य नामदेव काळे, गजानन पुंड, स्वाती धामणे, राजाराम धामणे, गोरख काळे, दगडू कडूस, संदीप काळे, रामचंद्र धामणे, विठ्ठल कडूस, शिवाजी धामणे, महेश कडूस, नाथा धामणे, जगन्नाथ कडूस, नानाभाऊ कडूस उपस्थित होते. सुभाष धामणे यांनी सूत्रसंचालन केले. शहाजान तांबोळी यांनी आभार मानले.