अहमदनगर : जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे, टँकर पाणीपुरवठा, तसेच चाराछावण्यांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार आ. रोहित पवार यांनी केली असून, त्याची चौकशी सरकार पातळीवर करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मुश्रिफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांनी जलयुक्त शिवार, तसेच दुष्कालात टँकरने पाणीपुरवठा केल्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तसेच चारा छावण्यांतही अनियमितता असल्याची माहिती बैठकीत दिली. त्यानुसार या सर्व प्रकरणांची राज्य सरकार चौकशी करेल, असे मुश्रीफ म्हणाले.‘लोकमत’चे स्टिंग‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून टँकरमधील अनियमितता उघड्यावर आणली. गेल्या वर्षी जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकर निविदाच संशयाच्या भोवऱ्यात होत्या. टँकरमालकांनी मागणी केल्याबरोबर शासनाने त्यांना दर वाढवून दिले. दर वाढवल्यावर पुन्हा निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे असताना जिल्हा प्रशासनाने आहे त्याच निविदेनुसार ठेकेदार नेमले. अनेक टँकरची जीपीएस यंत्रणाच बंद होती. टँकर येत नसल्याच्या ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. टँकरचे लॉगबुक अपूर्ण होते. अशा अनेक अनियमिततेवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता.
टँकर घोटाळ्याची चौकशी करणार - हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 6:00 AM