अहमदनगर : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला़ दहावीला अव्वल गुण मिळविलेल्या जिल्ह्यातील काही निवडक टॉपर मुलांशी व निवडक शाळांच्या मुख्याध्यापकांशी ‘लोकमत’ने आॅनलाईन संवाद साधत त्यांच्या यशाचे रहस्य समजावून घेतले. ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांनी प्रारंभी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे, शाळांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांनी प्रास्ताविक केले.
या आॅनलाईन संवाद सत्रात रेसिडेन्शिअल कॉलेजचे प्राचार्य ए़ आऱ दोडके, विद्यार्थिनी ऋतुजा गंगराणे, श्रद्धा लगड, सावेडीतील समर्थ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापक संगीता जोशी, प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका योगिता पवार, प्रगत विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे संतोष कुलकर्णी, सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका गिता तांबे, रेणावीकर विद्यालयाचे मुख्याध्यापक सायसिंग वसावे, आठरे पाटील पब्लिक स्कूलचे प्राचार्य कर्नल डी़ ए़ पाटील, विद्यार्थिनी विद्या गागरे, पाथर्डी येथील विवेकानंद विद्या मंदिरचे ज्ञानेश्वर गायके, पारनेर पब्लिक स्कूलचे प्राचार्य गिताराम म्हस्के, कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य एस़ व्ही़ गलांडे व विद्यार्थिनी स्वराली आंधळकर, श्रद्धा भागवत यांनी सहभाग घेतला़
आत्महत्या नको, बिनधास्त जगा कमी गुण मिळाल्याने निराश होणाºया अथवा आत्महत्या करणाºया मुलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? या प्रश्नावर टॉपर म्हणाले, परीक्षेत अव्वल येणे म्हणजेच यश नव्हे. तसेच कमी गुण मिळाले म्हणजे जीवनात लगेच अपयश येते असेही नव्हे. निराश होणे अथवा आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही. यश मिळाले नाही तर तणाव न घेता पुढील काम जोमाने करा.
तबला वाजविण्याचा मला छंद आहे़ परीक्षेत मला ५०० पैकी ४९१ गुण मिळाले तर तबला वादनाचे ९ गुण मिळाले़ त्यामुळे मला १०० टक्के गुण मिळाले़ आई-वडील दोघेही शिक्षक आहेत़ त्यामुळे घरी एकटी राहूनच मी अभ्यास केला़ शाळेत शिक्षकांनी चांगले शिकविले़ प्रत्येक महिन्याला चाचणी घेत़ शाळेतच जादा क्लास घेतले जात़ त्यामुळे बाहेर स्वतंत्र क्लास लावण्याची वेळ आली नाही़ नियमित अभ्यास केला़ जिद्ध, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असली तर यश मिळतेच़ चांगले गुण मिळविले म्हणजे भविष्य घडतेच असे नाही़ आपल्या आवडीच्या क्षेत्रात चांगले काम करणे म्हणजे यशस्वी होणे़ त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी हवी़-श्रद्धा लगड, रेसिडेन्शिअल हायस्कूल, नगर
प्रत्येक विषयानुसार अभ्यासाचे वेळापत्रक केले होते़ जादा तास न लावता सकाळी व संध्याकाळी रोज अभ्यास केला़ रात्री १२ वाजेपर्यंत अभ्यास करुन पुन्हा पहाटे ६ वाजताच उठून अभ्यासाला बसत होते़ पुढे इंजिनिअरींग करण्याचे ध्येय आहे़ - अनुष्का भालेराव, प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल.
आम्हाला शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन लाभले़ त्यामुळे चांगले गुण मिळाले़ विषयानुसार वेळापत्रक तयार करुन अभ्यास केल्यास यश हमखास मिळते़ त्यासाठी नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे़ मला इंजिनिअर होण्याचे स्वप्न आहे़ शिकताना मनोरंजन, पुस्तक वाचनही महत्त्वाचे आहे. -निधी गुंजाळ, सेंट विवेकानंद स्कूल, तारकपूर.
तणाव घेतल्याने अभ्यास होत नाही़ आवड असेल तर कितीही कठीण विषय असला तरी सोपा जातो़ दहावीच्या सुरुवातीपासूनच मी अभ्यासाचे नियोजन केले होते़ शिक्षकांनी दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण केल्यास काहीही अडचण येत नाही़-स्वराली आंधळकर, नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीगोंदा.
शिक्षकांनी दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण केला आणि सेल्फ स्टडी केल्यास कोणतेही जादा क्लास लावण्याची गरज नाही़ मी वर्षभर प्रत्येक खेळात सहभाग घेत होते़ अॅथलेटिक्स, हॉलिबॉलमध्ये मी विभागापर्यंत खेळले़ पण त्याचा अभ्यासावर कोणताही परिणाम झाला नाही़ त्याशिवाय रोज स्विमिंग करीत होते आणि ठरलेल्या वेळेत अभ्यास करीत होते़ -विद्या गागरे, आठरे पाटील पब्लिक स्कूल.