शहर व परिसरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:33+5:302021-06-01T04:16:33+5:30
अहमदनगर : नगर शहरात पावसाने एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मध्यवर्ती शहरात ...
अहमदनगर : नगर शहरात पावसाने एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. मध्यवर्ती शहरात जोरदार सरी कोसळल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा वाढला होता. सोमवारी चार वाजण्याच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा वाहू लागला. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू लागल्या. काहीवेळात वादळ थांबून पावसाची संततधार बराचवेळ सुरू होती. मध्यवर्ती शहरात पावसाचा चांगला जोर होता. सावेडी उपनगरासह बोल्हेगाव, नागापूर, नालेगाव, केडगाव आदी उपनगरातही पावसाच्या सरी कोसळल्या. शहरासह उपनगरांत सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. अर्धवट कामांमुळे कुष्ठधाम रोड, सर्जेपूरा, रामवाडी आदी भागांतील रस्त्यांत पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. दरम्यान, विद्युत पुरवठाही खंडित झाला. काही वेळाने पाऊस थांबला. परंतु, विजेचा पुरवठा सुरळीत झाला नव्हता. सावेडीतील निर्मलगर, लक्ष्मीनगर, सूर्यानगर आदी भागांत सर्वच अंधार होता. पावसामुळे सखल भागातून पाणी वाहिले असून, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.