शिर्डी : शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाची घोषणा अद्याप सरकारने केलेली नाही. मात्र, विश्वस्त मंडळात मद्यनिर्मिती करणारे राष्ट्रवादीचे कारखानदार, विविध प्रकारचे आरोप असणाऱ्या व्यक्तींची नावे समोर आल्याने टीका सुरू झाली आहे. शिवसेनेतही संभाव्य विश्वस्त मंडळाबाबत नाराजी असून सेनेचे काही नेते मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडणार आहेत.
साई संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद सेनेला देण्याचे धोरण ठरल्यानंतर संभाव्य विश्वस्त मंडळाची यादी सोशल मीडियात फिरत आहे. कोपरगावात तर काही नेत्यांच्या समर्थकांनी जल्लोषही केला. मात्र, जी नावे समोर आली त्यावर गंभीर आक्षेप जनतेतून नोंदविण्यात आले आहेत. संस्थानच्या शुद्धिकरणाबाबत न्यायालयीन लढाई लढत असलेले संजय काळे यांनी याबाबत पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे.
संस्थानच्या विश्वस्त मंडळात कोणत्या व्यक्ती असाव्यात याबाबत न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी नियमावली घालून दिली आहे. मात्र, शासन ही नियमावली व नैतिकता न पाळता दारू निर्मिती करणारे नेते, यापूर्वी अपात्र ठरलेले, न्यायालयाने जामीन नाकारलेले, संस्थानला मालमत्ता विकणारे आदींना विश्वस्त करणार असेल तर तो भाविकांचा अवमान आहे, असे काळे यांनी म्हटले आहे. विश्वस्त मंडळाच्या संभाव्य यादीत शिर्डीतील एकाही स्थानिक शिवसैनिकाचे नाव दिसत नसल्याने सेनेतही नाराजी आहे. यासंदर्भात शिर्डीत शिवसैनिकांची ज्येष्ठ नेते कमलाकर कोते यांच्या कार्यालयात बैठक झाली.
संभाजी ब्रिगेडचाही इशारा
शिर्डीच्या विश्वस्त मंडळात राजकीय व्यक्तींचा भरणा करू नका, असे पत्र संभाजी ब्रिगेडने यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. संभाजी ब्रिगेडने माजी कुलगुरू डाॅ. सर्जेराव निमसे, ॲड. असिम सरोदे, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, बद्रीनाथ महाराज तनपुरे, निवृत्ती महाराज आदी नावे विश्वस्त मंडळासाठी सुचविली आहेत. संस्थान राजकारण्यांचा व दारू निर्मिती करणाऱ्यांचा अड्डा बनवू नका, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा भोस यांनीही दिला आहे.