शेवगाव तालुक्यात डेंग्यू संशयित शेकडो रूग्ण, शासनदप्तरी दोघांचीच नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 04:19 PM2019-12-15T16:19:53+5:302019-12-15T16:20:19+5:30
वरूर येथील इयत्ता आठवीतील अनिकेत रावसाहेब तुजारे या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यावर प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागात मागील दोन महिन्यात दोघेच डेंग्यू संशयित असल्याची नोंद आहे.
अनिल साठे / धर्मनाथ ढाकणे ।
शेवगाव : तालुक्यातील वरूर येथील इयत्ता आठवीतील अनिकेत रावसाहेब तुजारे या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यावर प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागात मागील दोन महिन्यात दोघेच डेंग्यू संशयित असल्याची नोंद आहे. मात्र उपाचर घेतलेल्या तसेच सध्या उपचार घेत असलेल्या डेंग्यू संशयित (एन.एस.वन) रुग्णांची संख्या शेकडोच्या घरात असल्याचे दै. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे.
शेवगाव शहरातील विविध हॉस्पिटल, प्रयोगशाळांना भेटी दिल्या असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे. शासन निर्णयानुसार खासगी वैद्यकीय व्यावसायिक व प्रयोगशाळांना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार डेंग्यूचा संशयित रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला कळवणे बंधनकारक आहे. मात्र तालुक्यातील अनेक रूग्णालयांनी तशी माहिती दिली नसल्याचे समोर आले.
शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘लोकमत टीम’ने शहरातील तीन खासगी रुग्णालयांना भेटी देत चौकशी केली केली. यावेळी संबंधित वैद्यकीय चिकित्सकांनी गत दोन महिन्यात शेकडो डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी आल्याचे व शेकडो रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र शेकडो रुग्णांवर उपचार सुरू असतांना आरोग्य विभागाच्या दप्तरी दोनच रूग्णांची नोंद आहे. जिल्हा रुग्णालयाने कळवल्याने ‘त्या’ दोन नोंदी करण्यात आल्याचे संबंधित अधिका-याने सांगितले.
शहरातील काही रक्त, लघवी तपासणी प्रयोगशाळामधे जाऊन डेंग्यू आजाराच्या निदानासाठी आकरण्यात येणारे शुल्कासंबंधी चौकशी केली असता ९०० ते एक हजार रूपये आकारात असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराच्या निश्चित निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टिक ‘टेस्ट किट’चा वापर करण्यात येऊ नये, असे आदेश दिलेले असताना शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिकची रक्कम घेऊन रुग्णांची लूटमार सुरू असल्याचे समोर आले आहे.