आगडगावच्या ग्रामस्थांना स्वच्छतेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:19 AM2020-12-29T04:19:25+5:302020-12-29T04:19:25+5:30
या कार्यशाळेत नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी शीलकुमार जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक संदीप वलावलकर, ...
या कार्यशाळेत नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी शीलकुमार जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक संदीप वलावलकर, प्राथमिक आरोग्य केंद्र देवगावचे डॉ. मोरे, आत्मा (अॅग्रीकल्चर टेक्नोलॉजी मॅनेजमेंट एजन्सी)चे डोईफोडे व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डीअॅब्रिओ यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी शीलकुमार जगताप म्हणाले, ग्रामीण विकासामध्ये स्वच्छता हा कुटुंबाचा व गावचा आत्मा आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने आपले गाव व कुटुंब स्वच्छ ठेवणे हे कर्तव्य व जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवून गावाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शौचालय उभारून नियमितपणे त्याचा वापर करणे, सार्वजनिक परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
ज्यांनी अद्याप शौचालय बांधलेले नाहीत, बांधले असले तरी पाणी व इतर कारणासाठी वापर केला जात नाही, अशा कुटुंबांना या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आले. त्यासाठी गावातील प्राधान्यक्रमे निवडलेल्या १३५ वंचित कुटुंबांनी सहभाग घेतला.
या कार्यशाळेसाठी आगडगावचे सरपंच मच्छिंद्र कराळे, उपसरपंच किसन शिरसाठ, रांजणीचे सरपंच बाळासाहेब चेमटे, उपसरपंच विजय लिपने, रांजणी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक लिपने व दोन्ही गावांतील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे दिनेश शेरकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे कर्मचारी व गावातील ग्रामस्थांनी केले होते.
---फोटो- २७ आगडगाव
नाबार्ड व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नगर तालुक्यातील आगडगाव व रांजणी येथे ग्रामीण स्वच्छता जनजागृती अभियान कार्यशाळेत बोलताना नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी शीलकुमार जगताप, संदीप वालावलकर, आदी.