अकोले : वारकरी संप्रदाय शांतता प्रिय आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर माझ्या समर्थनार्थ मोर्चे, रॅली काढू नका. जमावाने आंदोलन करु नका. गावागावात निषेध सभा घेवू नका. चलो नगर.. या सोशल मीडियावरुन फिरणा-या पोस्टला प्रतिउत्तर देवू नका, असे आवाहन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (देशमुख) यांनी सोमवारी एका पत्रकाव्दारे केले आहे. दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी अकोलेकरांनी इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ अकोले तालुका बंदची हाक दिली होती. पण इंदोरीकर महाराजांच्या सूचनेवरुन बंद मागे घेण्यात आला. इंदोरीकर महाराजांचे मूळ गाव इंदोरी. रविवारी सकाळी ९ वाजता ग्रामसभेसाठी येथील ग्रामस्थ जमले होते. परंतु इंदोरीकर महाराजांचा निरोप आला. कसलेही आंदोलन करु नका. बंद, मोर्चा काढू नका. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन रद्द केले. दरम्यान ग्रामसभेत इंदोरीकर महाराजांविषयी राळ उठवणारांना अनुलेखाने प्रतिउत्तर देण्याचा ग्रामस्थांचा प्रस्ताव पुढे आला. इंदोरीकरांच्या वाट्याला कुणी जावू नका? वेळ पडल्यास इंदोरीचं पाणी दाखवू, असा सूचक, सुबरीचा सूरही ग्रामस्थांनी सभेत लावला होता. यावेळी सरपंच विकास देशमुख, अशोक पुंजाजी नवले, माजी सरपंच संतोष नवले, संतू नवले, हेमंत आवारी, केशव नवले, लक्ष्मण नवले, सुभाष नवले, अशोक कडलग, रवींद्र देशमुख, शिवाजी हासे, भाऊसाहेब सूर्यवंशी, सचिन जोशी, प्रवीण धुमाळ, इंदोरी विठ्ठल मंदिर देवस्थानचे विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. इंदोरीकर महाराज अनेक अनिष्ट सामाजिक प्रथांवर प्रहार करतात. ते जे बोलतात ते लोकांनाही पटते. त्याचा मतितार्थ ध्यानात घ्यावा. उगाच साप म्हणून भुई झोडपू नये, असे मत विष्णू महाराज वाकचौरे, देवराम वाकचौरे, गणेश वाकचौरे, अरुण वाकचौरे, सूर्यकांत ढगे, भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, दौलत वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, राजेंद्र गवांदे यांनी व्यक्त केले. दरम्यान कळस येथील ग्रामस्थांनी आम्ही इंदोरीकरांसोबत आहोत असा संदेश सोशल मीडियातून दिला आहे.
माझ्या समर्थनार्थ बंद, मोर्चे नकोत; इंदोरीकर महाराजांचे आवाहन; ग्रामसभा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 2:27 PM