शेवगाव : आदल्या दिवशी, भल्या पहाटे तोडून, निवडून ठेवलेला भाजीपाला, फळभाज्या भल्या सकाळी विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून सध्या अडवणूक सुरू आहे. कष्टाने फुलविलेला शेतमाल कवडीमोल भावात शेतकऱ्यांना विक्री करावा लागतो आहे. थोडा दर वाढवून मागितल्यास ‘माल द्यायचा असेल तर द्या, नाही तर घरी घेऊन जा’ असे उत्तर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिले जात आहे. घरी नेऊन मालाचे करायचे तरी काय या भावनेतून, परिस्थिती समोर हतबल झालेले शेतकरी मिळेल ती रक्कम पदरात पाडून घेत निराश मुद्रेने घरी परतत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मेपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे शेवगाव बाजार समिती बंद आहे. एरवी गजबजलेल्या आवारात शुकशुकाट आहे. दरम्यान, आठवडे बाजार, बाजार समिती बंद असल्याने शेतमाल कुठे अन् कसा विकावा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातील मशागतीची कामे सुरू असल्याने दारोदार जाऊन माल विकणे शक्य नाही. या संधीचा फायदा घेऊन किरकोळ व्यापाऱ्यांनी कवडीमोल किमतीत माल खरेदी करून चढ्या भावाने गल्ली-बोळात दारोदार फिरून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी उद्भवलेल्या या परिस्थितीचा सामना करताना उत्पादनाचा खर्च, कष्टाचे मोल मिळत नसल्याचे पाहून शेतात भाजीपाला सडलेला बरा, अशी भूमिका घेतली आहे.
--------
लिलाव, आठवडे बाजार बंदमुळे फटका..
बाजार समितीमध्ये होणाऱ्या मालाच्या लिलावातून बोलीमुळे थोडीफार का होईना, मालाच्या दर्जानुसार भाव मिळत होता. त्यामुळे काही अंशी तरी परवडत होते. मात्र आता ते लिलाव व आठवडे बाजार बंद असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मिळेल त्या भावात शेतमाल किरकोळ व्यापाऱ्यांच्या हवाली करावा लागत आहे.
--------
कांद्याने केले वांधे...
उन्हाळी कांदा साठवणूक करण्यासाठी सुविधा नसल्याने ८५ टक्के कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांधे झाले आहेत. लवकर खराब होणारा कांदा बाजार समिती बंद असल्याने फेकून देण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कांद्याने वांधा केल्याचे चित्र आहे.
-------
बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळभाज्यांची आवक होत आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी मालाची कमी दरात मागणी करीत आहेत. भाजीपाल्याला भाव राहिलेला नाही. कोबी, कोथिंबीरला अजिबात भाव मिळत नाही. मिरची व मेथीला थोडाफार भाव मिळतो. मात्र खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने मजूर लावून कोबी काढायला परवडत नाही.
- मच्छींद्र डाके, शेतकरी, शेवगाव
-------
शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. आठवडे बाजार, बाजार समिती बंद असल्याने शेतमालाचे करायचे तरी काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कडक निर्बंध लावत बाजार समिती सुरू ठेवल्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल.
- प्रशांत भराट, कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना