७४ लाख रुपयांची अवैध दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:43+5:302021-04-29T04:15:43+5:30
याप्रकरणी गहू देविसिंग भिल (वय ३५ वर्ष रा. रामुखेडी खुडेल, जि. इंदूर, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली ...
याप्रकरणी गहू देविसिंग भिल (वय ३५ वर्ष रा. रामुखेडी खुडेल, जि. इंदूर, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. २७ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास कारवाई करण्यात आली.
नगर येथील उत्पादन शुल्कच्या पथकाला अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार श्रीरामपूर येथील भरारी पथकाला कळविण्यात आले होते. चार दिवस बाभळेश्वर, अस्तगाव परिसरात सापळा लावला असता त्यास यश आले.
नगर-मनमाड महामार्गावरील अस्तगाव फाटा येथे गोवा राज्यनिर्मित अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या मालमोटाराची (क्र. एमएच १८ बीजी ५२७४) तपासणी केली असता ७४ लाख ८८ हजार रुपये किमतीच्या व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ५७ हजार ६०० बाटल्या (१२०० बॉक्सेस), तसेच २० लाख रुपये किमतीची मालमोटार असा माल मिळून आला. आरोपी भिल याला अटक करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा, पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक संजय सराफ, निरीक्षक अनिल पाटील, बी.टी.घोरतळे, ए.बी.बनकर, दुय्यम निरीक्षक एन.सी.परते, पी.बी. अहिरराव, डी.वाय.गोलेकर, के.यू. छत्रे. एम.डी.कोंडे, ए.सी.खाडे, व्ही.जी. सूर्यवंशी, व्ही.बी. जगताप, जवान भाऊसाहेब भोर, संजय साठे, मुकेश मुजमुले, एस.आर.वाघ, विकास कंटाळे, प्रवीण साळवे, नेहाल उके, के.के.शेख, निहाल शेख, दीपक बर्डे यांनी कारवाई केली. गुन्हाचा तपास दुय्यम निरीक्षक एन.सी. परते करीत आहेत.
------
अंतरराज्यीय टोळी सक्रीय...
गोवा राज्यांतील दारू प्रकरणात अंतरराज्यीय टोळी सक्रीय असण्याची शक्यता आहे. गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास केला जाणार आहे.
-गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नगर.
-------