अवैध वाळू उपसा : नाशिक-पुणे महामार्गावरील पुलांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 06:29 PM2018-10-06T18:29:31+5:302018-10-06T18:29:39+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरातील प्रवरा नदीवरील नव्या व जुन्या पुलांजवळच वाळूचा अवैध उपसा होत असल्याने दोन बड्या महानगरांना जोडणाऱ्या तीन पुलांना धोका निर्माण होवून नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत.
संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरातील प्रवरा नदीवरील नव्या व जुन्या पुलांजवळच वाळूचा अवैध उपसा होत असल्याने दोन बड्या महानगरांना जोडणाऱ्या तीन पुलांना धोका निर्माण होवून नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. तसेच प्रवरा नदीकाठी असलेले ऐतिहासिक घाटही या वाळू उपशाने खचले आहेत.
संगमनेर तालुक्यातून रात्रंदिवस सुरू असलेल्या या अवैध वाळू उपशाकडे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी आता संगमनेरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे. नाशिक-पुणे या दोन बड्या महानगरांना जोडणा-या प्रवरानदीवरील पुलाची निर्मिती ब्रिटीशांनी केली होती. या पुलास समांतर असा पुल चार वर्षांपूर्वी बांधण्यात आला. त्यानंतर नाशिक-पुणे बाह्यवळण रस्त्यावरही प्रवरानदीवर पुलाची बांधणी करण्यात आली.
या तिन्ही पुलांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. प्रवरानदी पात्रातील वाळूला मोठी मागणी आहे. मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वाळूमुळे वाळू माफिया मालामाल झाले असून त्यांनी प्रवरानदीपात्र ओरबाडण्याचे काम सुरू केले आहे. हे वाळू माफिया निर्सगाबरोबरच लोकांच्या जीवाशीही खेळत आहेत. ब्रिटीशकालीन पुल, त्यास समांतर पुल व बाह्यवळण रस्त्यावरील पुलाखालून मोठ्या प्रमाणात वाळू उपसली गेल्याने पुलाचा पाया पुर्णपणे उघडा पडला आहे. त्यामुळे या तिन्ही पुलांना धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरातून वाहणाºया प्रवरानदी तिरावर अनेक ऐतिहासिक घाट आहेत. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने हे खड्डे होवून घाटही खचले आहेत. याकडे मात्र, महसूल विभाग ‘अर्थपूर्ण’पणे डोळेझाक करीत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केला आहे. दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या या तिन्ही पुलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी आता होते आहे.
पुराव्यासह तक्रार करणार
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संगमनेरात येवून अवैध वाळू उपशामुळे प्रवरा, म्हाळूंगी व मुळा नदीपात्राची झालेली दुरावस्था पाहावी. तालुक्यात वाळूचा एकही लिलाव झाला नसून नदीपात्रातून मात्र, मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. वाळू माफियांशी लागेबांधे असलेल्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पुराव्यासह तक्रार करणार आहे. - अमोल खताळ, सामाजिक कार्यकर्ते, संगमनेर