तेल, पावडरपासून बनावट दूध बनविणाऱ्या संकलन केंद्रांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:24+5:302021-07-31T04:22:24+5:30

जामखेड (जि. अहमदनगर) : तालुक्यातील खर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दूध बनविणाऱ्या दोन संकलन केंद्रांवर पोलीस व अन्न, औषध ...

Impressions are gained in a fluid, global, diffused way | तेल, पावडरपासून बनावट दूध बनविणाऱ्या संकलन केंद्रांवर छापे

तेल, पावडरपासून बनावट दूध बनविणाऱ्या संकलन केंद्रांवर छापे

जामखेड (जि. अहमदनगर) : तालुक्यातील खर्डा व नागोबाचीवाडी येथील बनावट दूध बनविणाऱ्या दोन संकलन केंद्रांवर पोलीस व अन्न, औषध प्रशासनच्या पथकाने बुधवारी (दि.२८) सकाळी छापा टाकला. तेल व पावडरच्या सहायाने बनविलेले भेसळीचे २ हजार ११८ लिटर दूध यावेळी नष्ट करण्यात आले.

नागोबाचीवाडी येथील रहिवासी हरिभाऊ एकनाथ गोपाळघरे यांच्या मालकीच्या खर्डा व नागोबाचीवाडी येथील भगवान कृपा दूध संकलन केंद्रावर बनावट दूध तयार केले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळीच पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दाेन्ही ठिकाणी छापा टाकला. नागोबाचीवाडी येथून ८७८ लिटर तर खर्डा येथून १ हजार २४० लिटर असा एकूण २ हजार ११८ लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा हस्तगत केला.

१ हजार ६५७ किलो पावडर, तीस लिटर खाद्य तेल, केमिकल व अन्य बनावट दूध बनविण्याचे साहित्य घरातून व दूध संकलन केंद्रातून जप्त करण्यात आले. यावेळी जप्त केलेले बनावट दूध जागेवरच नष्ट केले. बनावट दूध तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेतले.

कारवाई केलेल्या पथकात पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस काॅन्स्टेबल आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी, अरुण पवार, संदीप राऊत, कोमल भुंबे आदींचा समावेश होता. अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त एस. पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

---

नमुने पाठविले प्रयोगशाळेत..

बनावट दूध तयार करण्याचे जप्त केलेल्या साहित्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी दिली.

----

३० खर्डा दूध

खर्डा येथील दूध संकलन केंद्रावर टाकलेल्या छाप्यात जप्त केलेले बनावट दूध बनविण्यासाठीचे साहित्य.

Web Title: Impressions are gained in a fluid, global, diffused way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.