संगमनेर : बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संगमनेरन्यायालयात शुक्रवारी (3 जुलै) त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीची न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली. इंदोरीकर महाराजांना ७ आॅगस्टला न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या विधानामुळे इंदोरीकर महाराजांविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर यांनी शुक्रवारी (१९ जून) संगमनेर न्यायालयात फिर्याद दिली होती. शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले. सरकारी वकील अॅड. लिना चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडली.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी इंदोरीकर महाराज यांच्याविषयी तक्रार केली होती. या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सांनी आदेश दिले होते. याची न्यायालयात आज पहिली सुनावणी झाली.