गहू, हरभरा सोंगणीची मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:20 AM2021-03-08T04:20:25+5:302021-03-08T04:20:25+5:30
शेवगाव : तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. गतवर्षीपेक्षा सोंगणीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा ...
शेवगाव : तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. गतवर्षीपेक्षा सोंगणीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हरभरा सोंगणीचा दर प्रतिएकर २ हजार रुपये येत असून, मजुरांकरवी काम करायचे झाल्यास महिलेला एका दिवसाची मजुरी २५० ते ३०० रुपये द्यावी लागते. गहू काढणी, मळणीसाठी तर एकरी तब्बल आठ ते दहा हजार खर्च येत आहे.
गत तीन - चार वर्षात कपाशीवर पडणारे विविध रोग, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यामुळे होरपळून निघालेले शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळत आहेत. कपाशी लागवडीला फाटा देत फळबाग, नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. दोन वर्षात तर खरीप हंगामातील सततचा पाऊस, परतीच्या पावसाने पिके वाया गेली. कपाशीतून फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात यंदा गहू, हरभऱ्याला प्राधान्य दिले.
तालुक्यात ८ हजार ११२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. त्यातून १ लाख २० हजार क्विंटल उत्पादन अपेक्षित होते. मात्र, ऐन फुलधारणाच्या वेळी ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे पिकांचे नुकसान झाले. परिसरात हरभऱ्याचे प्रतिएकर ३ ते ४ क्विंटल उत्पादन होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात ९ हजार २४५ हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला. गहू सोंगणीसाठी मजुरांना दिवसाला २५०, तर मळणीसाठी ३०० रुपये मोजावे लागतात. मळणी यंत्रासाठी ४ ते ५ हजार रुपये असा एकूण एकरी १० ते १२ हजार रुपये खर्च येतो. गहू, हरभरा सोंगणीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हरभरा सोंगणी खर्च (प्रतिएकर) : २००० ते २२००, मळणी : २०० रुपये पोते, उत्पादन (प्रतिएकर) : ३ ते ४ क्विंटल. गहू सोंगणी मजुरी : एक महिला २५० रुपये, पोते भरणे : ३०० रुपये. एकरी खर्च : मजुरी, मळणी यंत्रासह १० ते १२ हजार रुपये.
........
महागाई वाढल्याने मजुरी न परवडणारी झाली आहे. हाताला दुसरे काम नसल्याने पोट भरण्यासाठी शेतात काम करावे लागते. महागाईमुळे नाईलाजाने मजुरी वाढविणे भाग पडले. सरकारने किसान सन्मानसारखी योजना मजुरांसाठी आणून शेतमजुरांना दिलासा द्यावा.
: वैजीनाथ श्रीमंत घोडखिंडे
शेतमजूर, शेवगाव
-----
गहू काढणी, गोळा करणे, सोंगणी, पोते भरणे आदी कामांसाठी एकरी १० ते १२ हजार रुपये खर्च येतो. मागील वर्षी जे मजूर १५० रुपये मजुरी घेत होते. ते दर यंदा २५० ते ३०० झाले आहेत.
-आत्माराम घुणे,
शेतकरी, शेवगाव
---
०७ शेवगाव गहू
शेवगाव परिसरात सुरू असलेली गहू मळणी.