पाथर्डीत महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:06+5:302021-05-16T04:20:06+5:30
पाथर्डी : श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ व बर्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी शहरात सुरू केलेल्या महिलांसाठीच्या ...
पाथर्डी : श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ व बर्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी शहरात सुरू केलेल्या महिलांसाठीच्या स्वतंत्र कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत १४३ महिलांनी कोरोनावर मात केली. सध्या ४० महिला येथे उपचार घेत आहेत.
येथील कोविड सेंटरचे राष्ट्रसंत आनंदऋषीजी कोविड सेंटर असे नामकरण करण्यात आले. २२ एप्रिलला हे कोविड सेंटर सुरू झाले. येथे महिला रुग्णांसाठी सकाळी, चहा-नाश्ता, दुपारचे जेवण व सायंकाळचे जेवण असा दिनक्रम आहे. येथे जेवण, नाश्ता चांगल्या दर्जाचा दिला जातो. डॉ. दीपक देशमुख, डॉ. शिरीष जोशी, डॉ. विनय कुचेरिया हे रुग्णांची तपासणी करीत आहेत. डॉ. सुस्मिता क्षित्रे, निकिता लगड, देवीदास उरणकर या कोविड सेंटरमध्येच थांबून महिलांची काळजी घेतात. डॉ. क्षित्रे या रुग्णांचे मनोबल कसे वाढेल याकडे लक्ष देतात. विशेष म्हणजे या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत. याचा फायदा रुग्णांना होत आहे. रुग्णांना काही अडचण आल्यास संस्थेचे सचिव सतीश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त धरमचंद गुगळे हे तातडीने अडचण सोडवितात.
सकाळी रुग्णांकडून योगासने, प्राणायाम करून घेतले जातात. तालुक्यातील गावोगावच्या महिला येथे कोरोनाबाबतचा उपचार घेण्यासाठी येत आहेत. त्यांची चांगली मैत्री झाली आहे. अत्यंत आनंदी वातावरणात त्या उपचार घेत आहेत. लवकर बरे होऊन घरी आनंदाने जात आहेत. कोविड सेंटरमधील आठ दिवस म्हणजे माहेरी आल्यासारखे आहे, अशी भावना येथे उपचार घेतलेल्या महिला बोलून दाखवीत आहेत. या सेंटरमध्ये काही मुलीसुद्धा उपचार घेत आहेत. येथील वातावरण प्रसन्न आहे. बाहेर झाडांची सावली असल्याने त्या झाडाखाली महिला गप्पा करीत असतात. त्यामुळे आजाराचा तणाव मनावर राहत नाही. येथे १८३ महिला रुग्ण दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १४३ महिला ठणठणीत बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. ४० महिला उपचार घेत आहेत.
--
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ व बर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने हे कोविड सेंटर चालू आहे. पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फिरोदिया ट्रस्टने दिल्यामुळे रुग्णांची सोय झाली आहे.
- सतीश गुगळे
सचिव, तिलोक जैन प्रसारक मंडळ
--
येथील कोविड सेंटरमध्ये सर्व महिलाच आहेत. त्यामुळे येथे सात दिवस कसे गेले कळलेच नाही. येथील वातावरण व सोय खूप चांगली होती. डॉक्टर काळजी घेत होते व धीर देत असल्यामुळे दडपण नव्हते. त्यामुळे लवकर आराम वाटला.
रूपाली इंगळे,
कोरोनामुक्त महिला
---
१५ पाथर्डी महिला, १
पाथर्डी येथील महिलांसाठीच्या स्वतंत्र कोविड सेंटरमध्ये सकाळी महिलांकडून योगासने करून घेतली जातात.