भातरोपासाठी राब जाळणे पध्दत बंद होणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:39+5:302021-05-20T04:21:39+5:30
मे महिन्याच्या अखेरीस खरीप भात पीक तयारी म्हणून आदिवासी भागात राब जाळण्यास सुरुवात होते. राबणी म्हणजे भात आवणीसाठी (लावण्यासाठी) ...
मे महिन्याच्या अखेरीस खरीप भात पीक तयारी म्हणून आदिवासी भागात राब जाळण्यास सुरुवात होते. राबणी म्हणजे भात आवणीसाठी (लावण्यासाठी) ज्या ठिकाणी भातरोपे तयार करतात ती शेतातील जमीन भाजून जागा तयार करणे होय. जंगलातील झाडांचा पालापाचोळा आणि शेणाच्या गोवऱ्या, पावट्या जाळून रोप टाकण्यासाठी जागा तयार केली जाते.
या पारंपरिक पध्दतीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. राबच्या नावाखाली झाडे नष्ट होत आहेत. जागा भाजल्यामुळे तेथील जमिनीतील पोषक सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. जागा भाजल्यावर त्या जागी बियांचा उतारा उत्तम होतो हा समज चुकीचा आहे. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढविणारे सर्व घटक, जे पालापाचोळा व शेणाच्या पावट्या यातून मिळतात ते नष्ट होतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
दरवर्षी हजारो टन बायोमासही जाळला जातो. त्यातून उठणारे धुरांचे लोट कार्बन उत्सर्जित करतात. हे जैव विविधतेला घातक ठरत आहे. पालापाचोळा, शेणखत यातून मिळणारे कंपोस्ट खत या प्रक्रियेत जळून नष्ट होते.
............
जनजागृतीची गरज
पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून कृषी शास्त्रज्ञांनी भात रोपे गादीवाफा पद्धतीने तयार करण्याची शिफारस केली आहे. ही अतिशय सोपी व उपयुक्त पद्धत आहे. यासाठी एक फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे व सोयीनुसार लांब गादीवाफे तयार करून त्यावर शेणखत, गांडूळ खत, सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंड ही खते एकत्र करून त्यावर भाताचे बियाणे खुरप्याच्या साह्याने रेघा पाडून टाकावे. त्यामुळे तजेलदार भातरोप तयार होते. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
.................
फोटो आहे