जामखेड नगरपरिषद : पोटनिवडणूकीसाठी दुपारपर्यंत ५७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 05:02 PM2019-06-23T17:02:01+5:302019-06-23T17:02:58+5:30
नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणूकीसाठी चुरशीने मतदान चालू असून एक वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झाले आहे.
जामखेड - नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणूकीसाठी चुरशीने मतदान चालू असून एक वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झाले आहे. निवडणूकीसाठी भाजप, कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार रिंगणात असून शिवसेना व एक भाजप बंडखोर रिंगणात उतरले असून लढत चौरंगी लढत होत आहे. चारही उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रचार केला असल्याने निकालाचे गणित बदलणार आहे. भाजप पुढे जागा राखणे इतर तीन उमेदवाराचे मोठे आव्हान आहे.
आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. खर्डा चौक व महादेव गल्ली असे दोन बुथ असून मतदार संख्या १४२८ इतकी आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे सकाळी मतदानाचा वेग कमी होता. नऊच्या सुमारास मतदार घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली. दोन्ही बुथवर ठराविक अंतरावर चारही उमेदवाराचे समर्थक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरवातीला मतदानास निरुत्साह असला तरी त्यानंतर मात्र चुरशीने मतदान होऊ लागले. मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवाराचे कार्यकर्ते प्रयत्न करत होते.
दुपारी दिड वाजेपर्यंत खर्डा चौक उर्दू शाळा बुथवर ४०८ मतदान झाले त्यामध्ये महिला २०५ तर २०३ पुरुषांनी मतदान केले. तर महादेव गल्ली येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीतील बुथवर एकूण ४०६ मतदारांनी मतदान केले. १४२८ पैकी ८१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान वेळेपर्यंत ८० टक्के पेक्षा जास्त मतदान होण्याची शक्यता आहे.
विद्यमान उपनगराध्यक्ष फरिदा खान यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग १४ मधील नगरसेवक पदासाठी पोटनिवडणुकीत होत आहे. निवडणुकीत पाच उमेदवार रिंगणात आहेत. शेख जाकीया आयुब भाजपा, शेख परवीन सिराजोद्दीन काँग्रेस तर शिवसेना तालुका प्रमुख संजय काशिद यांची पत्नी रोहीणी काशिद अपक्ष तसेच बाजार समितीचे संचालक सागर सदाफुले यांच्या मातोश्री मैनाबाई ज्ञानदेव सदाफुले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष गुंदेचा यांच्या पत्नी छाया संतोष गुंदेचा हे निवडणूक रिंगणात आहेत. परंतु शेवटच्या दोन दिवस अगोदर त्यांनी शिवसेना उपक्ष उमेदवार रोहिणी काशीद यांना पाठिंबा दिला आहे.