जामखेड नगर परिषद हरकतींच्या निपटाऱ्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:28 AM2021-02-27T04:28:11+5:302021-02-27T04:28:11+5:30
जामखेड : नगर परिषद प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना आल्या आहेत. आवश्यक तेथे क्षेत्र भेटीद्वारे निर्णय ...
जामखेड : नगर परिषद प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना आल्या आहेत. आवश्यक तेथे क्षेत्र भेटीद्वारे निर्णय घेण्यासाठी अधिक कालावधी लागणार आहे. त्यातच सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधीत १५ दिवसांनी वाढविला आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी १ मार्च ऐवजी १५ मार्चला प्रसिद्ध होणार आहे.
जामखेड नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. २२ पर्यंत हरकती व सूचना घेण्यासाठी कालावधी दिला होता. १ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. २२ तारखेपर्यंत २ हजार ६७ इतक्या हरकती नगर परिषदकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे या हरकतींचा निपटारा करण्यासाठी प्रशासक अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी २१ प्रभागात तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी व मतदार केंद्र प्रतिनिधी यांची नियुक्ती करून २५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल देण्यास सांगितले होते.
प्रत्येक प्रभागात आलेल्या हरकती व सूचनांची दखल संबंधित नियुक्त समिती घेत नसल्याची तक्रार राहुल उगले, वसीम सय्यद, मनोज कुलकर्णी, प्रशांत राळेभात, दिगंबर चव्हाण, फिरोज बागवान, अमोल गिरमे यांनी केली. स्थळ पंचनामा करून संबंधित प्रभागात जेथे राहत असेल त्या प्रभागात मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासक जयश्री माळी यांनी हरकती व सूचनांवर आवश्यक तेथे क्षेत्र भेटीद्वारे वस्तूनिष्ठ निर्णय घेण्याकरिता अधिक कालावधी लागेल, असे सांगितले.
यावर मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी मतदार यादीत जे पत्ते आहेत, ते प्रभागनिहाय विधानसभा मतदार यादीनुसार त्या भागात आहेत त्याप्रमाणात तो माणूस त्या प्रभागात राहील, असे सुचवले; परंतु इच्छुक उमेदवारांचे समाधान झाले नाही. यावेळी अनेकांनी मागील नगर परिषदेसाठी जशी मतदार यादी आहे, त्याप्रमाणे मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली.
त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आता मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी १५ दिवस वाढवला असल्याने नियुक्त समितीचे कामकाज चालू राहील व सर्व शंकांचे निरसन होईल, असे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.