अहमदनगर : काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आणि राष्ट्रवादीचा हल्लाबोल म्हणजे आगामी निवडणुकीच्या तोंडावरचे नाटक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नगरमध्ये केली.महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात खा. दानवे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सोमवारी संवाद साधला. तसेच त्यांच्या उपस्थितीत सावेडी उपनगरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या निवडणुका भाजपच जिंकणार आहे. चार वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीवर शेतकरी खूशआहेत. लोकसभा, विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांसोबत एकत्रपणे लढण्याचा विचार आहे.सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा सरकारमधील अनुभव चांगला आहे. मात्र पक्ष संघटना वाढविण्यासाठी ते भाजपवर टीका करीत आहेत. त्यात काहीही गैर नाही. नगर महापालिकेत सन्मानाने युती झाली तरच एकत्र लढू अन्यथा स्वबळावर लढण्यासाठी भाजप सज्ज आहे.पक्षात कोणतीही गटबाजी नाही. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार राम कदम यांना पक्षाने खुलासा मागितलेला आहे. जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांनी पुन्हा पक्षात यावे. मीच पुढचा मुख्यमंत्री असे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दानवे म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेतेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस असे बोलले तर काय बिघडले?
जनसंघर्ष यात्रा ही निवडणुकीच्या तोंडावरचे नाटक : रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 10:16 AM