संगमनेर : तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र खैरे यांनी शुक्रवारी (दि.१२) लोणीमध्ये भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून गावाच्या विकास कामात नेहमीच होत असलेल्या अडवणुकीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे खैरे यांनी सांगितले.
जोर्वे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खैरे हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले, परंतु उर्वरित सदस्य हे आमदार विखे गटाचे निवडून आले होते. ते पुढे म्हणाले, सरपंच विरोधी पक्षाचा होता, तरी आमदार विखे यांनी विकासकामांना सहकार्य सुरूच ठेवले होते, परंतु विकास प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून वारंवार दबाव आणला जात होता. गावाच्या हिताकरिता सुरू असलेली कामे माझ्या एकट्याच्या विरोधाने बंद पडू नयेत, ही माझी भूमिका आहे. जोर्वे गावातील विकास प्रक्रीया आमदार विखे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक गतीने पुढे जावी आणि आपल्याला यामध्ये योगदान देता यावे, म्हणून भाजपत प्रवेश केला.
सरपंच खैरे यांच्या प्रवेशाप्रसंगी उपसरपंच गोकुळ दिघे, माजी सरपंच दिलीप इंगळे नानासाहेब थोरात, बाळासाहेब दिघे, जितेंद्र दिघे, शंकर माळी आदी उपस्थित होते.
...
१६ कोटींची विकास कामे
शिर्डी मतदारसंघात जोर्वे गावाच्या विकास प्रक्रियेला चालना मिळाली. आमदार विखे यांच्या सहकार्याने आतापर्यंत १६ कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली आहेत. जोर्वे ग्रामपंचायतीने नव्याने उभारलेले ग्रामसंसद भवनाचे उद्घाटन नुकतेच झाले, असेही सरपंच रवींद्र खैरे यांनी सांगितले.
...