श्रीरामपूर : राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खूनप्रकरणात चार आरोपींविरुद्ध ९४२ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात मंगळवारी दाखल करण्यात आले. श्रीरामपूर येथील पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी याप्रकरणी खुनाची उकल करत आरोपींना गजाआड केले. या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
पत्रकार दातीर हे मल्हारवाडी रस्त्याने घरी जात असताना ६ एप्रिल २०२१ मध्ये एका स्कॉर्पिओतून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. राहुरी शहरातील कॉलेज रोडवर रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी तपास हाती घेत आरोपी लाला ऊर्फ विक्रम अर्जुन माळी (वय २५, एकलव्य वसाहत) व तोफिक मुक्तार शेख (वय २१, राहुरी फॅक्टरी) या दोन आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी व अन्य साथीदार मात्र फरार होता. गुन्ह्याच्या तपासाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे तपास सोपविला.
उपअधीक्षक मिटके यांनी मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याला नेवासा फाटा येथून तर फरार आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेशमधील चटिया (ता. बीनंदनकी, जि.फत्तेपूर) येथून शिताफीने अटक केली. कान्हू मोरे यास आर्थिक मदत करणाऱ्या व्यापारी अनिल गावडे यालाही याप्रकरणी आरोपी करण्यात आले.
आरोपी मोरे व पत्रकार दातीर यांचे गणेगाव येथील शेतीवरून वाद होते. त्यातूनच मोरे याने साथीदार तोफिक शेख, अक्षय कुलथे व अर्जुन माळी यांना प्रत्येकी दहा हजार रुपये व स्वत:ची स्कॉर्पिओ देऊन कृत्य घडवून आणले.
आरोपींनी दातीर यांना दरडगाव येथील निर्जनस्थळी नेऊन जबर मारहाण करून ठार मारल्याचे तपासात समोर आले.
गुन्ह्याच्या तपासात दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि ६४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. अन्य कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
--------